माणगाव, पोलादपूर : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यामध्ये सोमवारी (दि. 12) अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पावसासह गारा पडल्या. संभाव्य लॉकडाऊनच्या भीतीने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली पहावयास मिळाली. दोन दिवस कोविड संकटामुळे करण्यात आलेल्या वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगाव बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी वर्दळ होती. यादिवशी सायंकाळी 4. 30 वाजता तुरळक मेघगर्जना, वादळवारा होऊन जोरदार, मुसळधार पाऊस पडला. अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता.पोलादपूर तालुक्यात सर्वत्र दुपारी 42 अंश सेल्सियस तापमानामुळे अंगाची काहीली होत असताना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशामध्ये काळे ढग दाटून येत तब्बल तासभर विजांच्या कडकडाटांसह मेघगर्जना करीत अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली. ग्रामीण भागात गारांचा पाऊसही झाल्याची माहिती प्राप्त झाली. दरम्यान, पुणे शहरातही सोमवारी दुपारपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शहरातील बिबवेवाडी, कोथरुड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, वानवडी, वारजे माळवाडी या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळायला सुरुवात झाली. उद्या गुढी पाडव्याचा सण असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेले पुणेकरांची वरूणराजाच्या हजेरीने चांगलीच तारांबळ उडाली.
पिकांचे नुकसान
अवकाळी पावसामुळे तालुक्यातील आंब्यांच्या झाडाचा मोहोर गळून पडला, तर कच्च्या कैर्यांनाही मोठ्या संख्येने गळती लागली. आधीच उन्हाने घामाच्या धारांनी ओथंबलेला पोलादपूरकर नागरिक थोड्या थोडक्या पावसाने सुखावला असला, तर शेतकरीराजा मात्र अवकाळीच्या या संकटामुळे हातातोंडाशी आलेले आंबापिक वाया गेल्याने चिंतातूरपणे केवळ पिकविमा योजनेच्या लाभाची आ वासून प्रतीक्षा करणार आहे.