Breaking News

प्लाझ्मा उपचार पद्धतीसाठी जनजागृतीची गरज

नितीन देशमुख-

आटपाट नगरातील राजाचे निधन झाल्यावर राजपुत्राने मित्रांंच्या सल्ल्याने राज्य चालवण्यास सुरुवात केली. राजपुत्राला प्रशासन कसे चालवतात याची माहिती नसल्याने मित्रांनी त्याचा फायदा घेण्यास सुरुवात केली. कोणताही निर्णय घेताना त्याला चुकीचा सल्ला दिला जात होता. राजपुत्राने आपले सगळे अधिकार गाव पातळीवरच्या अधिकार्‍यांना दिल्याने ते उर्मट आणि वरचढ बनले. हा बिचारा हतबल झाला. प्रसंगी प्रजेसमोर गेल्यावर आपण हे केले पाहिजे, आपल्या हे करायला पाहिजे आणि आपण हे करू यासारखे भाषण देण्यात धन्यता मानू लागला. बेरक्या काकांनी त्याला कोणताही निर्णय घेऊ न देता त्याचे घोंगडे भिजत ठेवायाला शिकवले. त्यामुळे राज्यात कोणताही निर्णय होत नव्हता. राज्यातील प्रजा त्रस्त झाली होती. त्याचवेळी महामारी आली. वेळीच कोणती उपाय योजना कशी करावी, हे त्याला समजत नव्हते. राजा गोंधळून गेला दुसर्‍याला दूषणे देत चर्चे पे चर्चा करीत बसला. महामारीने रौद्ररूप धारण केले. अशीच काहीशी अवस्था सध्या आपल्या राज्याची झालेली पाहायला मिळत आहे.

कोरोनाची दूसरी लाट आली असून, राज्यात दर दिवसाला हजारो नवीन रुग्ण आढळत आहेत. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आरोग्यमंत्री नेहमी कोरोंनावर उपचारासाठी  प्लाझ्मा आणि रक्ताचा तुटवडा असल्याचे सांगतात. मात्र त्याबाबत जनजागृती करताना मात्र दिसत नाहीत. करोनातून  बर्‍या झालेल्या रुग्णांच्या रक्तद्रवा (प्लाझ्मा) चा वापर या विषाणूवर उतारा म्हणून परिणामकारक ठरत आहे. अर्थात ही युक्ती नवीन नाही. विषाणूजन्य आजारात पुर्वीही त्याचा वापर केला जात होता. युक्ती जुनी असली तरी ती नव्या विषाणूत वापरताना त्याची शहानिशा करावी लागते. त्यामुळे करोनावर ही युक्ती वापरताना कुठले नियम पाळायचे हे आता ठरलेले आहे. बर्‍या झालेल्या रुग्णाचा रक्तद्रव थेट गंभीर रुग्णाच्या शरीरात टोचल्यानंतर तो, लस जे काम करते त्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने काम करतो. फक्त यात बर्‍या झालेल्या रुग्णांचे रक्तगट जुळणे व त्या दात्याची रक्तद्रव देण्याची तयारी महत्वाची असते. 

कोरोनावरील उपचारांसाठी बर्‍या झालेल्या रुग्णांचा रक्तद्रव वापरण्यात येणार आहे. या पद्धतीला रक्तद्रव उपचार पद्धती म्हणजे ब्लड प्लाझ्मा थेरपी म्हणतात.  भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने या उपचार पद्धतीच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. तशी पहिली चाचणी केरळमधील श्रीचित्रा तिरुनाल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अ‍ॅड टेक्नॉलॉजी या संस्थेत झाली आहे. दिल्ली, गुजरात, केरळ व महाराष्ट्र ही राज्ये ही उपचार पद्धत वापरण्यास सज्ज आहेत.

रक्तद्राव (प्लाझ्मा) उपचार पद्धती नेमकी काय आहे हे आता जाणून  घेणे आवश्यक आहे. संपूर्ण जग हे कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. कोेरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना बर्‍या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा देऊन कोरोना रुग्णांच्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. करोना किंवा कुठल्याही विषाणू-जीवाणूजन्य आजारात बरे झालेल्या रुग्णातील रक्तद्रव त्याच विषाणू किंवा जीवाणूमुळे गंभीर आजार झालेल्या दुसजया रुग्णास टोचला जातो तेव्हा त्या रुग्णात प्रतिकारशक्ती वाढून तो बरा होतो. यालाच रक्तद्रव उपचार पद्दती म्हणतात. बर्‍या झालेल्या व्यक्तीचा रक्तद्रव टोचल्याने त्या व्यक्तीच्या रक्तात विषाणू किंवा जीवाणूविरोधात निर्माण झालेले प्रतिपिंड नवीन रुग्णास मिळतात. त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती प्रणाली ही विषाणू किंवा जीवाणूशी चांगला लढा देते.

या उपचार पद्दतीत बर्‍या झालेल्या रुग्णाचे 800 मिली रक्त घेतले जाते, त्यातून रक्तद्रव (प्लाझ्मा) वेगळा काढून तो गंभीर रुग्णास टोचला जातो. मात्र रक्त देणारा रुग्ण बरा होऊन त्याची पंधरा दिवसांनी परत चाचणी करुन ती सकारात्मक येणे गरजेचे असते. शिवाय त्याच्या रक्तात विषाणू मारणारे प्रतिपिंड आहेत का, याचा शोध घेतला जातो. जेव्हा एखादा विषाणू मानवी शरीरात घुसून हल्ला करतो, तेव्हा आपली प्रतिकारशक्ती  त्याविषाणूला मारण्यासाठी प्रतिपिंड तयार करते, बर्‍या झालेल्या रुग्णात हे प्रतिपिंड तयार झालेले असतात. त्यामुळे त्या व्यक्तीचा रक्तद्रव हे दुसर्‍या गंभीर रुग्णांसाठी परिणामकारक औषध ठरते,  असे गुरगाव येथील फॉर्टिस मेमोरियल रीसर्च इन्स्टिट्यूटच्या सल्लागार नेहा गुप्ता यांनी म्हटले आहे.

 रक्तद्रव (प्लाझ्मा) दान ही रक्तदानासारखीच प्रक्रिया असते. प्लाझ्मा दात्याला एक छोटेसे यंत्र लावले जाते त्यातून प्लाझ्मा घेतला जातो. त्याचवेळी तांबड्या रक्तपेशी परत शरीरात सोडल्या जातात. रक्तदान कितीवेळा करावे याला मर्यादा असतात तर प्लाझ्मा दान आठवड्यातून दोनदा करता येते. प्लाझ्मा उपचार पद्दत ही 1918 मधील स्पॅनिश फ्लूमध्ये वापरण्यात आली होती. इबोला साथीच्या वेळीही 2013 मध्ये ती वापरण्यात आली. 2003 मध्ये सिव्हीयर अ‍ॅक्युट रिस्पेरेटरी सिंड्रोम म्हणजे सार्सच्या साथीतही त्याचा वापर झाला. गोवर, जीवाणूजन्य न्यूमोनिया व इतर संसर्गात या पद्दतीचा वापर करण्यात आला आहे. आरोग्य कर्मचारी व डॉक्टर्स यांच्यात करोना संक्रमण होण्याचा धोका अधिक आहे. त्यांच्यासाठीही प्लाझ्मा पद्दत वापरली जाऊ शकते. भारतातही प्लाझ्माचा वापर सुरू झाला आहे, पण त्यासाठी लोकांच्या मनात असलेली भीती दूर करण्याकरिता आणि प्लाझ्मादान विषयी जनजागृती करणे गरजेच आहे.

कोरोनाच्या संकटाशी आपण लढत आहोत आणि प्लाझ्मा हे या लढ्याचं प्रमुख शस्त्र आहे. मात्र राज्यात त्याचीच कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आम्ही कोरोनातून बर्‍या झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची प्लाझ्मासाठी चाललेली धडपड आम्ही पाहतोय. लोकांच्या मनात प्लाझ्मा दान करण्याविषयी भीती आहे. त्यामुळे या विषयी जनजागृती करणे गरजेच आहे.  -नीलम आंधळे, दिशा महिला मंच

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply