आशीष शेलार यांचा पवारांवर निशाणा
मुंबई : प्रतिनिधी
जाणते आजोबा नातवडांसमोर मुके… मुके, आजोबांच्या डोळ्यासमोर आता राजकीय धुके… धुके, अशा शब्दांत भाजपचे नेते आशीष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
एकाच घरातील किती जणांनी निवडणूक लढवायची, असा सवाल करीत नव्या पिढीला संधी देण्याकरिता निवडणूक लढविणार नाही, असे शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्यासाठी शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून माघार घेतली होती; तर शरद पवारांचे दुसरे नातू रोहित यांनी निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन आजोबांना केले होते. एका नातवासाठी पवारांना माघार घ्यावी लागली असतानाच दुसर्या नातवाने विरोधात भूमिका घेतल्याने पवार कुटुंबातच सारे काही आलबेल नाही, अशी चर्चा
सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशीष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रवादीवर निशाणा साधला. शेलार ट्विटमध्ये म्हणतात, एक नातू म्हणाला, आजोबा आजोबा निवडणुका तुम्हीच लढवा. दुसरा नातू म्हणाला, आजोबा आजोबा मीच पार्थ मीच लढणार. आजोबांना होती ताईंची काळजी; तर दादांना पोराची… जाणते आजोबा नातवडांसमोर मुके… मुके… मुके… आजोबांच्या डोळ्यासमोर आता राजकीय धुके… धुके… धुके…