कर्जत : बातमीदार
तालुक्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कर्जत, माथेरान आणि नेरळ या शहरी भागात दररोज रुग्ण आढळत आहेतच, ग्रामीण भागातही रुग्ण सातत्याने आढळून येत असल्याने तेथील जनता भयभीत झाली आहे. दरम्यान, तालुक्यातील 70 घरांची वस्ती असलेल्या कोठिंबे गावात 60पेक्षा अधिक रुग्ण आढळले असल्याने संपूर्ण गाव कोरोना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. एप्रिल महिना सुरु झाल्यापासून कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे प्रामुख्याने कडाव, कशेळे, शिलार, पोखरकरवाडी, नेरळ अशी काही गावे गेल्या काही दिवसांपासून बाधित ठरत आहेत. कशेळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील कोठिंबे गावात मागील काही दिवसात कोरोनाचे 12 रुग्ण आढळले होते. तर गेल्या दोन दिवसात कोठिंबे गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पन्नाशी पार गेली असून, आठ दिवसात गावातील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, गटविकास अधिकारी बाळाजी पुरी तसेच पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग कोठिंबे गावात मदतकार्य करीत आहेत. दरम्यान, कर्जत तालुक्यातील कडाव गावातदेखील मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन तयार केला आहे. नेरळमधील 40 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. कोठिंबे गावात सोमवारी 23 नवीन रुग्ण आढळून आले असून, तेथे 60 हुन अधिक रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत. आजपर्यंत तालुक्यात 2621 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकी 2119 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले असून 386 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.