पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीत कचरा व घाणीची समस्या गंभीर झाली आहे. येथील स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्याच्या कडेला नाला व मोकळ्या जागेत कचरा, कोंबड्यांचे अवशेष आणि पिसे टाकण्यात आली आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, तेेथील व्यवसाईक, प्रवासी व नागरिक हैराण झाले आहेत. पाली स्मशानभूमी परिसरातून जाणारा मोठा नाला सांडपाणी व घाणीने तुंबला आहे. याबरोबरच शेजारी असलेल्या येथील मोकळ्या जागेवर चिकन मार्केटमधून कोंबड्याची पिसे व अवशेष टाकण्यात आले आहेत. येथे कचरादेखील टाकण्यात येतो. येथील घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात अशा प्रकारची घाण व दुर्गंधी घातक आहे. याठिकाणी मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांचाही उपद्रव वाढला आहे. पाली नगरपंचायतीने या परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी येथील रहिवासी व व्यावसायिकांनी केली आहे.
परिसरातील दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात नगरपंचायतीकडे तक्रारीदेखील केल्या आहेत.
-विजय घावटे, व्यवसाईक, पाली, ता. सुधागड
पाली स्मशानभूमी परिसरातील कचर्याची समस्या लवकरच मार्गी लावण्यात येईल.
-दिलीप रायण्णावार, प्रशासक, पाली नगरपंचायत