Breaking News

उरणमध्ये आरोग्य यंत्रणेचा बोजवारा; राज्य शासनाचे दुर्लक्ष एक डॉक्टर, एक नर्सच्या बळावर कोरोनाशी लढा

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

उरणच्या एकमेव डेडिकेटेड कोविड हेल्थकेअर सेंटरमध्ये डॉक्टर्स, नर्स, वार्ड बॉय आणि अन्य कर्मचार्‍यांची मोठ्या प्रमाणावर उणीव भासत आहे, मात्र दररोजच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सध्या उपलब्ध असलेल्या दोन डॉक्टर, दोन नर्स आणि अन्य सहा कर्मचार्‍यांवरच कोविड सेंटरचा भार येऊन पडला आहे. याकडे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.अशा वाढत्या रुग्णसंख्येच्या ताणामुळे उपलब्ध असलेले कर्मचारी आजारी पडले तर उरणकरांसाठी असलेले 47 बेडचे एकमेव कोविड सेंटरच व्हेंटिलेटरवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देश, राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.उरण तालुकाही यास अपवाद नाही. वाढत्या औद्यौगिकीकरणामुळे अल्पावधीतच देशाची दुसरी आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या उरण परिसरालाही कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत चालला आहे. उरण परिसरातील कोरोनाबाधीत रुग्णांवर उरणमध्येच उपचारासाठी मागील वर्षी जेएनपीटी, केअर पॉईंट आणि कोविड केअर सेंटर अशी तीन कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली होती. यावर्षी मात्र 35 बेड क्षमतेचे केअर पॉईंट बंद करण्यात आले आहे. जेएनपीटीच्या ट्रॉमा सेंटरमधील 40 बेडच्या डेडिकेटेड कोविड हेल्थकेअर सेंटरसाठी जेएनपीटीने आवश्यक स्टाफ नियुक्त केला आहे. बोकडवीरा येथील सिडकोच्या प्रशिक्षण केंद्रात जेएनपीटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले 120 बेडचे कोविड केअर सेंटर या तीन कोविड केअर सेंटरचा उभारण्यात आले होते. कोविड केअर सेंटरही सध्या असुविधांमुळे कोविड रुग्णांसाठी उपयोगात आणले जात नाही. त्यामुळे उरण परिसरातील सर्वच कोरोनाबाधीत रुग्णांचा संपूर्ण भार सध्या बोकडवीरा येथील एकमेव असलेल्या 47 बेड क्षमतेच्या डेडिकेटेड कोविड हेल्थकेअर सेंटरवर येऊन पडत आहे.उरणमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे.त्यामुळे रुग्ण संख्येबरोबरच एकमेव असलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थकेअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होणार्‍या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. उरकरांसाठी एकमेव असलेल्या 47 बेडच्या बोकडवीरा येथील डेडिकेटेड कोविड हेल्थकेअर सेंटरसाठी  डॉक्टर आठ , नर्स 12, वार्डबॉय 4 अशा कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडे आवश्यक कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती उरण येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बद्रे यांनी दिली आहे. बोकडविरा येथील डेडिकेटेड कोविड हेल्थकेअर सेंटरमध्ये स्वच्छेने काम करण्यासाठी तयार असणार्‍या उरणमधील 34 खासगी डॉक्टरांची यादी जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य विभागाकडे सोपविण्यात आली आहे, मात्र याबाबत दुर्दैवाने अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती डेडिकेटेड कोव्हीड हेल्थकेअर सेंटरचे समन्वयक संतोष पवार यांनी दिली आहे.

अतिरिक्त ताणामुळे उपलब्ध स्टाफही आजारी पडला तर डेडिकेटेड कोविड हेल्थकेअर सेंटर लवकरच व्हेंटिलेटरवर जाण्याची भितीही येथील नागरिक व्यक्त करीत आहे. तसेच डॉक्टरांअभावी मात्र गरीब-गरजू रुग्णांना उपचारासाठी नवी मुंबई, पनवेलमध्ये पाठविण्याची वेळ प्रशासनावर येत असल्याची खंतही नागरिकांनी व्यक्त केली.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply