कर्जत : बातमीदार
मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील मुंबई-पुणे मार्गावरील कर्जत-खोपोली मार्गावर 25 मार्चपासून प्रवासी सेवेची वाहतूक बंद होती.त्यानंतर सोमवारी (दि. 2) या मार्गावर कोरोना अनलॉकमध्ये उपनगरीय लोकल सेवा सुरू झाली आहे. दरम्यान, लोकल सेवा सुरू झाल्याने खोपोली आणि खालापूर औद्योगिक वसाहतीत काम करणार्या तरुणांचा वाहतूक व्यवस्था नसल्याने हिरावून गेलेला रोजगार मिळू शकणार आहे.
कर्जतपासून खोपोली मार्गावर लोकल सेवा चालवली जाते.खोपोली आणि खालापूर भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती असल्याने कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावातील कामगार नोकरी साठी कर्जत-खोपोली लोकलने प्रवास करून जात होता. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उपनगरीय लोकल सेवा बंद करण्यात आली होती. मागील काही महिने अत्यावश्यक सेवेमधील कामगार वर्गासाठी उपनगरीय लोकल सेवा सुरू झाल्या आहेत. त्यात कर्जत पासून मुंबई सीएसएमटी अशी लोकल सेवा सुरू झाल्या आहेत, आणि दुपारच्या वेळी सरसकट सर्व महिला प्रवाशाना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र मागील अनेक वर्षे कर्जत-खोपोली मार्गावर लोकल सेवा सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे कामगार वर्ग आणि मोलमजुरी करणारा वर्ग तसेच महिला यांच्याकडून सातत्याने कर्जत-खोपोली मार्गावर उपनगरीय सेवा सुरू करण्याची मागणी होत होती.
अखेर सोमवारी कर्जत येथून पहाटे पावणे पाच वाजता खोपोली करिता पहिली लोकल धावली. कर्जत-खोपोली मार्गावर ज्याप्रमाणे उपनगरीय लोकलची वाहतूक असायची, त्या वेळापत्रकानुसार उपनगरीय लोकल सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण असून लोकल सेवेमुळे आता परवानगी दिलेल्या अनेकांना कर्जत-खोपोली मार्गावर देखील लोकल प्रवास करता येणार आहे. मात्र लोकलमधून महिला प्रवासी, तसेच मध्य रेल्वेने परवानगी दिलेल्या अत्यावश्यक सेवेतील कामगार, बँक कर्मचारी यांनाच प्रवास करता येणार आहे. त्यामुळे खोपोली, खालापूर भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरी करणार्या कामगार वर्गाला लोकलमधील प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आ. महेंद्र थोरवे यांनी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला पत्र पाठवून केली आहे.