दुसरी लाट शिखर गाठण्याआधीच तिसर्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी तिसरी लाट कधीही येऊ शकते असा इशारा अधिकृतरित्या दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट नेमकी कधी आणि कशी येईल, तिचा जोर कितपत असेल याचा अंदाज मात्र तज्ज्ञांनाही अजुन आलेला नाही. तथापि, जुलै-ऑगस्टच्या सुमारास तिसर्या लाटेचे महासंकट अंगावर येणार असा ढोबळ अंदाज आहे. कोरोना या महासाथीच्या दुसर्या लाटेशी संपूर्ण भारत प्राणपणाने झुंजतो आहे. या लाटेचे शिखर तरी आपण गाठले आहे की नाही याचाही अद्याप अंदाज लागत नाही. रुग्णसंख्येतील चढउतार आणि छातीत धडकी भरवणारा मृत्यूदर यामुळे कोरोनाची दुसरी लाट जीवघेणी ठरली आहे. गेल्या वर्षी याच काळात आपण सारे कोरोना महासाथीच्या पहिल्या लाटेमध्ये गटांगळ्या खात होतो. सप्टेंबर अखेरीस कोरोनाचा तडाखा उणावल्यासारखे वाटू लागले. त्यामुळेच शासन-प्रशासन आणि जनता गाफिल राहिले. फेब्रुवारी अखेरीस दुसरी लाट त्सुनामीसारखी येऊन आदळणार याचा अंदाज तज्ज्ञांना आला होता, परंतु त्याला तोंड देण्याची तयारी मात्र राज्य सरकारांनी, विशेषत: महाराष्ट्रातील सरकारने केलीच नव्हती असे दिसून येते. केंद्रीय आरोग्यपथके वारंवार महाराष्ट्राला भेट देऊन जात होती आणि केंद्रीय आरोग्य विभागातर्फे सावधगिरीचे इशारेदेखील देण्यात येत होते, परंतु त्या काळात महाविकास आघाडीचे सरकार वेगळ्याच राजकीय उद्योगात मशगुल होते. ही काही एकमेकांची उणीदुणी काढण्याची वेळ नव्हे हे खरे, परंतु राज्याची आरोग्ययंत्रणा बेसावध राहिली हे मान्य करायलाच हवे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये वृद्ध आणि सहव्याधी असलेले रुग्ण सर्वाधिक बळी गेले होते. दुसर्या लाटेत कोरोना विषाणूच्या संसर्गाचा जोर अधिक आहे, त्यामुळे ही लागण चाळिशीच्या आतील तरुणांना मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. येणार्या तिसर्या लाटेमध्ये लहानग्या मुलामुलींवर संकट ओढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या तरी हा अंदाजच असला तरी त्यामुळे सार्यांच्याच काळजात धडकी भरली आहे, कारण दुसर्या लाटेचा मुकाबला करतानाच आरोग्ययंत्रणा मेटाकुटीस आली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीर व टोसिलिझुमॅब सारख्या औषधांचा तुटवडा यांच्या बातम्या तर आपण दररोज पहात किंवा वाचत आहोत. तिसरी लाट येईपर्यंत आपली आरोग्ययंत्रणा पार थकून गेलेली असणार हे वेगळे सांगायला नको. मोठमोठाली जम्बो इस्पितळे उभी करून आणि भराभर खाटा टाकून इस्पितळे उभी राहात नसतात. त्यासाठी पुरेशा संख्येने डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय्ज, प्रशासकीय कर्मचारी आणि तंत्रज्ञ यांची गरज अनिवार्यपणे लागते. नेमक्या याच समस्येशी आपला देश तूर्तास झगडतो आहे. सध्या दुसरी लाट ओसरण्याच्या बेतात आहे असे वाटू लागले आहे, परंतु त्याबद्दल कुठलेही ठोस विधान करणे घाईचे ठरेल. सारांश एवढाच की दुसरी लाट असो वा तिसरी किंवा चौथी, आपल्या सर्वांनाच यापुढील काही काळ कमालीचे सावध रहावे लागणार आहे. ही जबाबदारी जेवढी सरकारची आणि प्रशासनाची आहे, तितकीच ती आपल्यासारख्या जनसामान्यांचीदेखील आहे. कठोर निर्बंध पाळून पुरेशी काळजी घेत चिवटपणे झुंजणे हा एकमेव उपाय सध्यातरी आपल्या हाती आहे. या घटकेला सारेच देशवासी कोविड योद्ध्याप्रमाणे ठामपणे उभे राहतील, अशी अपेक्षा आहे.
Check Also
पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्या प्रयोगशाळांवर कारवाई करणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्या …