Breaking News

मुरूड : प्रतिनिधी

फणसाड अभयारण्यातील रस्त्याच्या कडेला असणारे सुके गवत जाळण्यासाठी अभयारण्य प्रशासनाकडून नवाबाचा राजवाडा येथून जळीत रेषा काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. मुरूड तालुक्यामधील सुपेगाव परिसरातील सुमारे 54 किमी चौरस क्षेत्रात फणसाड अभयारण्य विस्तारले आहे.  जैव विविधतेने समृद्ध अशा या अभयारण्यात विविध पक्षी, प्राणी व इतर वन्यजीव यांचे वन विभागातर्फे योग्य संवर्धन केले जात आहे. अनेक लोक या अभयारण्य क्षेत्रातून आपली दैनंदिन कामासाठी जात असतात. पर्यटकांचाही येथे नियमित वावर असतो. अभयारण्यातील रस्त्याच्या कडेला सुके गवत अथवा सुकलेली झाडेझुडुपे असतात. एखाद्या व्यक्तीने जळती माचीस काडी अथवा सिगारेट येथील सुक्या गवतावर टाकल्यास वन संपदेची अपरिमित हानी होण्याची दाट शक्यता असते. तसे होऊ नये यासाठी अभयारण्य प्रशासनाकडून रस्त्याच्या कडेला असणारे सुके गवत जाळण्यासाठी दरवर्षी जळीत रेषा काढली जाते. वनपाल व वनमजूर त्यासाठी मेहनत घेतात. यंदाही नवाबाच्या राजवाड्यापासून जळीत रेषा काढण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली. या वेळी अभयारण्याचे वनक्षेत्रपाल तुषार काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड-विहूर रस्त्यालगत जाळ रेषा काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. नांदगाव परिमंडळाचे वनपाल आदेश पोकळ, वनरक्षक अरुण पाटील, वनमजूर बाळाराम गोणभरे, किशोर धनावडे, हरेश पतेने, रमेश चव्हाण यांच्यासह फणसाड अभयारण्याचे सर्व कर्मचारी व आदिवासी बांधव जाळ रेषा काढण्यात सहभागी झाले होते.

वनातील पक्षी, वन्यजीव व वनसंपदा सुरक्षित राहण्यासाठी दरवर्षी अभयारण्य प्रशासनामार्फत जाळ रेषा काढण्याचे काम केले जाते. त्यामुळे वणवे लागण्याचे प्रमाण खूप कमी झाले असून, पक्षांची घरटी, वन्यजीव आणि वनसंपदेचा बचाव होत आहे.

-तुषार काळभोर, वनक्षेत्रपाल, फणसाड अभयारण्य

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply