रेवदंडा, अलिबाग, नागाव, काशिद, मुरूड समुद्रकिनार्यांवर शुकशुकाट
रेवदंडा : प्रतिनिधी
पर्यटकांना उंट सवारीचा आनंद देणार्या उंट व्यावसायीकांना लॉकडाऊची झळ बसली आहे. प्रतीवर्षी अलिबाग व मुरूड तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांच्या सेवेसाठी येणारे उंट या वेळीही पर्यटन हंगाम सुरू होण्या आधीच परतीच्या प्रवासाला लागले आहेत.
पावसाळ्यातील बंद असलेला समुद्रकिनार्यावरील पर्यटन व्यवसाय गणपती उत्सवानंतर हळूहळू सुरू होतो आणि उन्हाळ्याच्या सुट्टीदरम्यान हा पर्यटन व्यवसाय चांगलाच भरभराटीला येतो. या पर्यटन हंगामात अलिबाग तालुक्यातील अलिबाग, मांडवा, नागाव व रेवदंडा तसेच मुरूड तालुक्यात काशिद व मुरूड आदी समुद्रकिनारी लोणावळा परिसरातून दरवर्षी उंट व्यावसायीक येतात. शनिवार व रविवार तसेच अन्य सुट्टीच्या येणार्या पर्यटकांना हे व्यावसायीक उंट सवारीचा आनंद मिळवून देतात. पर्यटकही हमखास उंटावर बसून फेरफटका मारतात. या समुद्रकिनार्यावरील उंट सावरी हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. त्यातून उंट आणि व्यावसायीकांचा चांगला उदरनिर्वाह होतो.
गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत उंट व्यावसायिकांना ऐन एप्रिल, मे महिन्यात पर्यटकांअभावी माघारी जावे लागले होते. यंदाही लॉकडाऊनमुळे पर्यटकांनी पाठ फिरविल्याने अलिबाग, मांडवा, नागाव, रेवदंडा, मुरूड, काशिद आदी समुद्रकिनारी आलेले उंट व व्यावसायीक सध्या परतीच्या मार्गाला लागले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्षे अलिबाग व मुरूड तालुक्यातील समुद्रकिनारी येणार्या पर्यटकांची संख्या फारच कमी झाली आहे. त्यामुळे समुद्रकिनारी पर्यटकांना उंटावरून फिरविणारे व्यावसायीक आणि त्यांच्या उंटावर उपासमारीची वेळ आली आहे.