कर्जत : प्रतिनिधी
येथील नगर परिषदेचे सेवानिवृत्त मुख्यधिकारी दादाराव अटकोरे यांनी आपल्या मुलीचा विवाह सोहळा अवघ्या अकरा जणांच्या उपस्थितीत संपन्न करून कोरोना महामारीच्या काळात समाजापुढे एक आदर्श ठेवला. शासनाने कितीही निर्बंध आणले तरी त्याचे तंतोतंत पालन होतेच असे नाही. मध्यतंरी विवाह सोहळ्यासाठी 50 जणांची उपस्थिती असावी असा आदेश होता मात्र तो बासनात गुंडाळून विवाह सोहळ्याला दहापट म्हणजे 500 ते 600 लोकांची गर्दी अनेक ठिकाणी पहायला मिळाली. त्यापूर्वी होणार्या साखरपुडा किंवा हळदी समारंभालाही लक्षणीय गर्दी होत होती. मात्र या फालतू प्रतिष्ठेमुळेच गावागावात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामध्ये काहींना जगाचा निरोप घ्यावा लागला. कर्जत नगर परिषदेत दोन वेळा मुख्याधिकारी म्हणून काम करून सेवानिवृत्त झालेले दादाराव अटकोरे हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील मालेगावचे. त्यांनी आपली कन्या डॉ. ऋतुजा हिचा विवाह थाटामाटात करण्याचा विचार होता, कारण त्यांच्या कुटूंबातील हे पहिलेच लग्न होते. मात्र गेल्या वर्ष सव्वावर्षांपासून कोरोना महामारीचे संकट सुरू आहे. शासनाने सर्वच समारंभांवर निर्बंध घातले आहेत. अटकोरे यांच्या मुलीचे लग्न गणपतराव सालवे (रा. सिल्लोड, जि. औरंगाबाद) यांचा मुलगा आकाशकुमार याच्याबरोबर ठरले होते. त्यांनी शासकीय नियमांचे पालन करूनच लग्न सोहळा करायचे ठरविले व त्यांना सालवे कुटुंबियांनी पूर्ण सहकार्य केले. गर्दी टाळण्यासाठी दोघांनीही आपापल्या गावी विवाह सोहळा करायचा नाही, असा ठाम निश्चय केला. व कर्जतला लग्न सोहळा करण्याचे निश्चित केले. लग्नाचा दिवस उजाडला. कर्जतच्या राज कॉटेजमधील एका छोट्या सभागृहात लग्न सोहळा सुरू झाला. विवाह सोहळ्यासाठी 25 जणांच्या उपस्थितील परवानगी होती तरीही या वेळी वधू – वरांसह दोन्ही कुटुंबातील मिळून केवळ अकरा माणसे तसेच दोन फोटोग्राफर, दोन बौद्धचार्य, एक ब्राम्हण, दोन जेवण वाढणारे असे एकूण अठरा जण उपस्थित होते. विवाह बौद्ध व हिंदू धर्म आशा दोन पद्धतीने पार पडला. हिंदू रितीरिवाजानुसार विवाहाच्या वेळी वधू – वरांच्या मागे मामा उभे असतात. त्यांची कमतरता मंडप तयार करणार्या दोघांना बोलवून भरुन काढली. हा आदर्श सर्वानी डोळ्यासमोर ठेवला तर कोरोनाचे संकट नक्कीच दूर होईल.