Breaking News

लॉकडाऊनमुळे कारखाने अडचणीत

मालाला उठाव नाही; कच्चा माल मिळत नाही

रोहा : महादेव सरसंबे

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागल्याने बाजारपेठेत आर्थिक मंदी दिसून येत आहे. त्याचे परिणाम म्हणून छोटे-मोठे व्यवसाय बंद पडलेत. कच्चामाल मिळत नसल्याने पक्का माल तयार करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. काही कारखाने चालू आहेत, पण त्यांच्या तयार मालाला उठाव नाही. उत्पादन निघत नसल्याने तसेच उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने कारखानदारांची आर्थिक घडी विस्कळीत होताना दिसत आहे.

रायगड जिल्ह्यात धाटाव, नागोठणे, बिरवाडी, वेळे भागड, रसायनी, पाताळगंगा, पनवेल, उरण, तळोजा, खोपोली, खालापूर आदी औद्योगिक क्षेत्रासह विविध ठिकाणी मोठमोठे कारखाने आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रासायनिक, इंजिनियरिंग, औषध उत्पादन करणारे व त्यासाठी लागणारा कच्चामाल तयार करणारे कारखाने यांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात सुमारे चार हजार कारखाने आहेत.

कोरोना आणि लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका इंजिनिअरिंग व बांधकाम व्यवसायाला बसला आहे. त्याखालोखाल रासायनिक कारखान्यांवर परिणाम झाला आहे. फक्त औषध निर्मितीचे कारखाने काही प्रमाणात चांगल्या पद्धतीने सुरू आहेत.

कारखाने आर्थिक संकटात सापडण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या तयार मालाला उठाव नाही व कच्चामाल मिळत नाही. रासायनिक कारखान्यांना लागणारा कच्चामाल जेथून येतो, त्या पुरक कारखान्यात फार थोड्या प्रमाणात कच्चामाल उत्पादित होत असल्याने व काही कारखाने बंद असल्याने रासायनिक कारखान्यांना कच्चामाल मिळत नाही. त्यामुळे रासायनिक कारखान्याची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. ज्या कारखान्यातून उत्पादन सुरू आहे, त्यांच्या मालाला बाजारपेठ नाही. तयार मालाला बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे कारखानदारांना पूर्वीपेक्षा जास्त आर्थिक भार सोसावा लागत आहे. बहुतांशी रासायनिक कारखान्यात विविध रसायने, रंग तयार होतात. त्यांना परदेशातून कच्चामाल कमी प्रमाणात येतो व तयार  माल परदेशात पाठवण्यासाठी येणारा खर्च वाढला असल्याचे रोहा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष पी. पी. बारदेस्कर यांनी सांगितले.

रंग निर्मिती करणार्‍या कारखान्यांना लागणार्‍या कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत. या कारखान्यावर काही प्रमाणात कोरोनाचा परिणाम झाल्याचे दिसून येत असल्याने हे कारखाने आर्थिक संकटात आहेत. हे कारखाने उभारण्यासाठी काही प्रमाणात बँकेचे कर्ज कारखानदारांनी घेतले आहे हे कर्ज फिरवताना त्यांना अनेक अडचणी येत आहेत.

रायगड जिल्ह्यात लोखंड व त्या संबंधित अनेक कारखाने आहेत. त्याला पूरक म्हणून इंजिनियरिंग कारखाने आहेत हे कारखानेही आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. त्यांना कामगारांचाही फटका बसला आहे. कामगारांचाही प्रश्न पुढे येत आहेत. परराज्यातील कंत्राटी कामगार नोकरी सोडून गेले आहेत. काही कारखान्यातील कामगारांत कोरोना संसर्ग वाढत आहे. औषध निर्मिती करणारे व त्यांना कच्चामाल पुरविणारे कारखाने चालू आहेत यांना कच्चामाल वेळेस मिळणे आवश्यक आहे तर हे कारखाने चांगल्या पद्धतीने चालू शकतील.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply