Breaking News

पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना नो एंट्रीच?

खारघर : प्रतिनिधी : नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात खारघर शहरामधील नैसर्गिक पांडवकडा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. मुंबई उपनगर ते कल्याण, ठाणे, तसेच रायगड जिल्ह्यातील पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या या धबधब्यावर सुरक्षेच्या कारणावरून यंदाही बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

वनविभागाने अधिकृतरीत्या याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतला नसला, तरी या वर्षी देखील पर्यटकांना पांडवकडा धबधब्याचे जवळून दर्शन दुर्लभच असणार आहेत. अद्याप मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला नाही, मात्र कोणत्याही क्षणी पाऊस हजेरी लावू शकतो. अशा वेळी धबधबे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. यापैकीच खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर दरवर्षी हजारो पर्यटक येतात, मात्र अतिउत्साहाच्या भरात किंवा हलगर्जीपणामुळे अनेक वेळा या ठिकाणी अपघात घडतात. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळेच वनखात्याने या ठिकाणी पर्यटकांना येण्यास मज्जाव केला आहे. मागील अनेक वर्षात पर्यटक दगावण्याची मालिका या ठिकाणी सुरू आहे. वनविभागाने पांडवकडा धबधब्याच्या परिसरात विविध कामे देखील केली आहेत. त्यामध्ये नेचरपार्कअंतर्गत प्रस्तावित कामांपैकी जल व मृदसंधारण, दगडी नालाबांधणीच्या कामांचा समावेश आहे. एकूण प्रस्तावित क्षेत्रांपैकी 550 हेक्टर क्षेत्रावर 24,598 घ.मी. नाला बांधण्यात आला आहे. दगडी नाला बांधण्याच्या कामामुळे उतारावरून येणार्‍या पाण्याचा वेग कमी होऊन पाण्यासोबत येणारी माती अडविली जाते. सिमेंट बंधारे पांडवकडा धबधब्यात येणारे जास्तीत जास्त पाणी अडविणार असल्याने धबधब्याचे अस्तित्व चिरकाल टिकेल.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाच्या वतीने या ठिकाणी सिमेंटची भिंत उभारण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 29 लाख रुपयांचा निधी मागील वर्षी देण्यात आला होता, मात्र यंदादेखील पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना बंदीचा निर्णय कायम ठेवण्याची शक्यता आहे.

पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. नवी मुंबईमध्ये अशाप्रकारे नैसर्गिक पर्यटनस्थळ मोजकीच आहेत. त्यामुळे वनविभागाने सुरक्षा यंत्रणा राबवून पर्यटकांना पांडवकडा धबधब्यावर प्रवेश दिला पाहिजे. तशी मागणी आम्ही वनविभागाकडे करणार आहोत.

-लीना गरड, नगरसेवक व सभापती, महिला  बालकल्याण समिती, पनवेल मनपा)

पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना प्रवेश द्यावा की नाही. याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन करून याबाबत निर्णय घेतला जाईल.

-डी.  एस.  सोनावणे, अधिकारी, वनविभाग पनवेल

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply