Breaking News

तंदुरुस्ती राखणारे मुरूडचे परशुराम पालशेतकर

पाऊणशे वयोमानात दिवसाला 10 नारळांच्या झाडांवर चढून काढतात माडी

मुरुड : प्रतिनिधी

शहरातील परशुराम पांडुरंग पालशेतकर (वय 78) हे रोज किमान 10 नारळांच्या झाडावर चढून माडी काढतात व ती विकून या वयातही आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत.

कोकणच्या समुद्रकिनार्‍यावर उंच उंच नारळ (माड), सुपारीची झाडे आहेत. नारळाच्या झाडापासून विविध प्रकारचे उत्पन्न मिळते. माडापासून माडीसुद्धा काढता येते. गोड व आंबट चवीचे माडी हे पेय पर्यटकांबरोबरच स्थानिकांचेही आकर्षण आहे. किमान चार मजली इमारती एवढ्या उंच असणार्‍या नारळाच्या झाडावरून माडी काढली जाते. हा माडी काढण्याचा व्यवसाय कोकणातील प्रामुख्याने कित्ते भंडारी समाज गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. मुरूडमधील परशुराम पालशेतकर वयाच्या 78व्या वर्षीही माडी काढण्याचा व्यवसाय करतात.  सडपातळ देहयष्टी असल्याने पालशेतकर या वयातही अगदी सहज नारळाच्या उंच झाडावर सरसर चढून जातात. झाडावरून काढलेली माडी ते माडी केंद्राला विकतात.

दुसर्‍याची नारळाची झाडे पालशेतकर एका वर्षाच्या करारावर विकत घेतात. त्यापासून काढलेली माडी ते माडी केंद्राला विकतात. त्यातून त्यांना दिवसाला  किमान पाचशे रुपयांची कमाई होते. रोज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते माडी काढण्याचे काम सुरू करतात. व अवघ्या दोन तासात ते काम पूर्ण करतात. पावसाळ्यातसुद्धा त्यांचे काम सुरू असते. फक्त जोरदार वारे अथवा मुसळधार पाऊस असेल तरच त्यांना काम थांबवावे लागते.

वय 78 वर्षे असूनसुद्धा परशुराम पालशेतकर नित्यनेमाने माडावर चढून माडी काढण्याचे काम करतात. वय झाले तरी मन तरुण असेल तर जगातील कोणतीही कामगिरी सहज पार पाडता येते, हे पालशेतकर यांच्याकडे पाहिल्यावर सहज लक्षात येते. माणसाने सतत काम करीत राहिले पाहिजे, कामात राम आहे, असा संदेश ते आजच्या युवा पिढीस देतात.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply