पनवेल ः प्रतिनिधी
तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसून रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टी भागाबरोबरच पनवेल महापालिका क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात झाडांचे नुकसान झाले आहे. झाडे पडल्याने रस्ते बंद झाले होते. या वेळी प्रभाग क्रमांक 20चे नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी पोदी आणि भिंगारी भागात स्वत: जाऊन वादळग्रस्तांना मदत केली. तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सहा हजार 26 घरांचे अंशतः नुकसान झाले. वादळामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात झाडे पडली. त्यामुळे रस्ते बंद होऊन वाहतूकही बंद झाली होती. सोमवारी पोदी, भिंगारी, ओएनजीसी परिसरात झाडे पडल्याची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 20चे नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर हरिश्चंद्र कडू, अभियंता कर्डीले आणि अभिजित भवर यांना त्या ठिकाणी बोलावून जेसीबीच्या मदतीने रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला केली. तसेच नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन तेथील विद्युत आणि पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठीही मदत केल्याबद्दल पोदी, भिंगारी, ओएनजीसी परिसरातील नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.