पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कळंबोली गावातील कालभैरव मंगल कार्यालयाच्या जागेत शहर उपजीविका केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. शहरी गरिबांना माहिती व व्यवसायाशी संबंधित माहिती या केंद्रावर मिळणार असून 20 मे रोजी महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. शासन निर्णयानुसार ज्या शहराची लोकसंख्या पाच लाखांपेक्षा जास्त परंतु 10 लाखांपर्यंत आहे अशा शहरांकरिता तीन केंद्र उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पनवेल महापालिकेची लोकसंख्या ही पाच लाखांपेक्षा जास्त असल्याने पालिकेला तीन शहर उपजीविका केंद्र उभारणे आवश्यक आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत निर्माण झालेल्या सेवा व इतर उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देणे तसेच शहरी गरिबांना माहिती व व्यवसायासंबंधी आवश्यक सहाय्य सेवा मिळण्याकरिता अभियानांतर्गत शहर उपजीविका केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी तसेच गरिबांना आवश्यक ती मदत होणार आहे. डेएनयूएलएमच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपजीविका केंद्राच्या स्थापनेसाठी प्रतिउपजीविका केंद्र ठरावीक चौरस फूट जागा आवश्यक असून सदर जागा ही महापालिकेच्या मालकीची किंवा भाड्याने घेतलेली असणे आवश्यक होते. त्यानुसार पनवेल महापालिकेने कळंबोली येथील स्वतःच्या मालकीच्या कालभैरव मंगल कार्यालयाची जागा याकरिता निवडली आहे. उपजीविका केंद्राकरिता प्रत्येकी 10 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. 28 मार्च रोजी कळंबोली येथील उपजीविका केंद्राला मान्यता देण्यात आली आहे.
उपजीविका केंद्राची उपयुक्तता
– विविध प्रशिक्षण रोजगार माहिती, विविध शासकीय योजनांतर्गतच्या संधी व माहिती
– सामाजिक विकास योजनांची माहिती
– यूआयडी, आधार कार्ड इ. नोंदणी (ई-सेवा केंद्र)
– वस्तू आणि उत्पादन नोंदणी माहिती
– शहरी गरीब सेवेचे विपणन
– लाभार्थी, इतर व्यक्तींचे बँक खाते उघडणे – आवश्यकतेनुसार विविध प्रकारच्या सेवा