एकीकडे कोरोनाचे संकट कायम असताना दुसरीकडे वरुणराजा रुसल्याने ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट राज्यात उभे ठाकले आहे. अपुर्या जलसाठ्यामुळे काही ठिकाणी पाणीकपातीचाही निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राला ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागले होते. यंदा परिस्थिती आतापर्यंत तरी नेमकी उलट दिसत आहे.
भारतीय उपखंडात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीन प्रमुख ऋतू आहेत. या प्रत्येक ऋतूतील विशेषत: पावसाळ्यातील चार महिन्यांचा काळ अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. कारण वर्षभराच्या पाण्याची तजवीज वर्षा ऋतूमध्ये होत असते, परंतु अलिकडच्या काळात पावसाचा भरवसा राहिलेला नाही. वर्षाच्या बारा महिने तो कधीही, कुठेही पडत असतो. यालाच आपण अवकाळी पाऊस म्हणतो. कधी-कधी गारपीटही होते. हाच पाऊस त्याच्या नियमित काळात मात्र अनियमित पडतो. गेल्या काही वर्षांपासून वरुणराजा मुहूर्ताला हजेरी लावतो आणि त्यानंतर दडी मारून बसतो. मग जूनच्या अखेरिस किंवा जुलैमध्ये तो मुसळधार बरसतो. एवढेच नव्हे तर जाता जाता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तो जोरदार वृष्टी करतो. गेल्या वर्षीही त्याचा प्रत्यय आला. यंदाही पावसाचे आगमन मुहूर्तावर झाले. निसर्ग चक्रीवादळात पर्जन्यवृष्टी देखील झाली. त्यानंतर तो गायब झाला. त्यामुळे शेतीची कामे रखडली होती. अखेर जलधारा बरसल्या आणि बळीराजा सुखावला. आता मान्सून सक्रिय झाला असे वाटत असतानाच तो पुन्हा हरवला. तेव्हापासून त्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. ज्या महिन्यात मुसळधार पाऊस पडतो तो जुलै महिना या वर्षी सुना सुना गेला. यंदाच्या पावसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा पाऊस इतर कुठे नाही पडला तरी कोकणात हमखास पडतो, पण आतापर्यंत तरी कोकणाला पावसाने हवी तशी साथ दिलेली नाही. तळकोकणातील अपवाद वगळता रायगड, ठाणे, पालघर, मुंबईतही पावसाने सर्वांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. दुसरीकडे पाऊस-पाण्याचे दुर्भिक्ष्य असणार्या मराठवाड्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. तरीही राज्यातील पावसाची एकूण सरासरी समाधानकारक म्हणता येणार नाही. पाऊस नसल्याने उन्हाच्या झळा अंगाला लागत असून, सध्या उन्हाळा सुरू आहे की काय अशी शंका येण्याइतपत उकाडा जाणवत आहे. परिणामी सारेच बेजार झाले आहेत. बळीराजा तर डोळ्यात प्राण आणून वरुणराजाची अक्षरश: चातकासारखी वाट पाहत आहे. येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही तर पिके करपण्याचा धोका आहे. पावसाअभावी मोठ्या शहरांत ऐन पावसाळ्यात पाणीकपात करण्याची वेळ आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे सोमवारपासून पावसाचे दमदार आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट भागात तर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे येरे येरे पावसा म्हणण्याची वेळ सर्वांवर आली आहे. अशा वेळी हवामान खात्याने चांगली बातमी दिली आहे. हवामान खात्याचे अंदाज अनेकदा चुकत असल्याचा आजवरचा इतिहास आहे, पण या वेळचा त्यांचा अंदाज खरा ठरो, अशीच सारे जण प्रार्थना करीत आहेत. कारण आधीच कोरोना, लॉकडाऊन व त्यामुळे विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत असताना पाऊस नसेल तर भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. म्हणूनच सार्यांना आता पावसाची आस लागली आहे.