मालिकेत 1-1ने बरोबरी
लंडन ः वृत्तसंस्था
महिला टी-20 स्पर्धेतील अटीतटीच्या सामन्यात भारताने इंग्लंडला नऊ धावांनी पराभूत केले. या विजयासह मालिकेत 1-1ने बरोबरी झाली आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र इंग्लंडचा संघ 140 धावा करू शकला.
इंग्लंडकडून आघाडीला फलंदाजीसाठी आलेल्या टम्सिनने चांगली खेळी केली. तिने 50 चेंडूंत 59 धावा केल्या. यात सात चौकारांचा समावेश होता. इंग्लंडची धावसंख्या 13 असताना डॅन्नी वॅटच्या रूपाने पहिला गडी बाद झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या 32 असताना नॅट स्किवर धावचीत झाली. ती केवळ एक धाव करून बाद झाली. संघाची धावसंख्या 106 असताना टम्सिन पायचीत झाली. मग इंग्लंडच्या फलंदाजीला गळती लागली. एक एक करीत फलंदाज तंबूत परतले. नाइट, डंकले, जोन्स, ब्रंट, विलियर्स झटपट बाद झाले.
तत्पूर्वी, भारताकडून सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी चांगली खेळी केली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 70 धावांची भागिदारी रचली. फ्रेया डेविजच्या गोलंदाजीवर फटका मारताना मानधना झेलबाद झाली. तिने अवघ्या 16 चेंडूंत 48 धावा कुटल्या. त्यानंतर संघाची धावसंख्या 72 असताना शफाली बाद झाली. तिचे अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकले. तिने 38 चेंडूंत 48 धावा चोपल्या. या खेळीत आठ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. विशेष म्हणजे इंग्लंडची गोलंदाज कॅथरीन ब्रंटने टाकलेल्या चौथ्या षटकात शफालीने सलग पाच चौकार मारले.
यानंतर हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्माने संघाची बाजू सावरली, मात्र संघाची धावसंख्या 112 असताना हरमनप्रीत बाद झाली. तिने 25 चेंडूंत 31 धावा केल्या. यात प्रत्येकी दोन चौकार आणि षटकारांचा
समावेश होता. त्यानंतर रिचा घोष आली आणि अवघ्या आठ धावा करून तंबूत परतली. 20 षटकांचा खेळ संपला तेव्हा दीप्ती शर्मा नाबाद 24, तर स्नेह राणा नाबाद 8 या धावसंख्येवर होती.