Breaking News

‘कोवॅक्सिन‘ला डब्ल्युएचओची मान्यता नाही

मंजुरी मिळेपर्यंत लसधारकांना विदेश प्रवासात अडचण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जगात अनेक देशांमध्ये आता लॉकडाऊन हळूहळू उठवला जातोय, पण आंतरराष्ट्रीय प्रवाशांना परवानगी देताना डब्ल्युएचओ मान्यताप्राप्त लस हा महत्त्वाचा घटक बनलाय. त्याचमुळे भारतात कोवॅक्सिन ही भारत बायोटेकची लस घेतलेल्यांना मात्र पुढच्या काही दिवसांसाठी तरी अडचण जाणवणार आहे.

देशाबाहेर प्रवास करू इच्छिणारे भारतीय कोवॅक्सिन पेक्षा कोविशिल्ड लसीच्या शोधात आहेत. कुठलीही लस घ्या, परिणामकारता सारखीच असे देशाचे आरोग्यमंत्रालय सांगत असतानाही असे का होतेय तर याचे कारण कोवॅक्सिन जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलेल्या लसींच्या यादीत अजून समाविष्ट नाही. त्याचमुळे अनेक देश केवळ कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देते. कोरोना काळात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली बनतेय, आणि त्यात मान्यताप्राप्त लस घेतलेल्यांनाच प्रवेश असा नियम अनेक देशांनी लागू केलाय, काही त्या तयारीत आहेत.

एरवी देशाबाहेर जायचे तर पासपोर्ट- व्हिसा आवश्यक असतो. पण कोरोनामुळे जीवनशैलीत जे अनेक बदल आणले त्यात आता याही गोष्टीचा समावेश झालाय, कारण तुम्ही कुठली लस घेतलीय यावरच तुम्हाला त्या देशात प्रवेश मिळणार की नाही हे ठरते आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत सीरमची कोविशिल्ड, मॉडेर्ना, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, सायनोफार्मसारख्या लसींचा समावेश आहे, पण कोवॅक्सिन मात्र यादीत नाहीये.

कुठल्या लसीला देशात परवानगी द्यायची हा संपूर्णपणे त्या देशाचा अधिकार आहे. कोवॅक्सिन हैदराबादच्या भारत बायोटेक आणि आयसीएमआरने संयुक्तपणे विकसित केली आहे. भारतात या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकानी जानेवारीतच परवानगी दिली. जागतिक आरोग्य संघटनेकडे कोवॅक्सिनच्या मान्यतेचा अर्ज अजून प्रलंबित आहे. मे-जूनमध्येच याबाबतची एक प्राथमिक बैठक पार पडेल. त्यानंतर या लसीबाबतची सगळी कागदपत्रे, पुरावे सादर होऊन जागतिक आरोग्य संघटना त्याबाबतचा निर्णय घेईल.

आंतरराष्ट्रीय प्रवासात मान्यताप्राप्त लसींबाबत जे नियम होतायत, त्याचा सर्वाधिक परिणाम परदेशी शिकणार्‍या विद्यार्थ्यांवर होतोय. ऑगस्टच्या दरम्यान या विद्यार्थ्याचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होते. त्यामुळे आत्तापासूनच त्यांना प्रवासाची तयारी करणे आवश्यक आहे, पण भारतात कोविशिल्ड ऐवजी कोवॅक्सिन लस घेतलेल्यांना डब्लुएचओची परवानगी मिळेपर्यंत प्रवासात अडचणी येऊ शकतात.

अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत लसीकरण आवश्यक केले आहे. एकतर  त्यांच्या देशाने स्वत: विकसित केलेल्या लसी किंवा जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत असलेल्या लसीच ग्राह्य धरल्या जातायत. कोवॅक्सिन ही लस भारताने अनेक देशांमध्ये निर्यातही केलीय, पण आत्तापर्यंत केवळ 10 पेक्षा कमी देशांनीच प्रवासाच्या परवानगीसाठी ही लस ग्राह्य धरलीय. ज्यात नेपाळ, मॉरिशस, फिलीपीन्स, इराण, मेक्सिको, गयाना, पॅराग्वे, झिम्बाब्वे फिलीपीन्स या देशांचा तूर्तास समावेश आहे. त्यामुळे आता इतर देशांमध्ये स्वतंत्रपणे निर्णय होतायत का आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत कोवॅक्सिन कधी येते हे पाहावे लागेल.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply