Breaking News

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव दिले पाहिजे -नगरसेवक विकास घरत

पनवेल : वार्ताहर

नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचा चंग बांधलेल्या स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त बांधवांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वपक्षीय बैठकांच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचा रोष जागोजागी उमटत आहे. नामांतर वादाच्या याच पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विकास घरत यांच्यासोबत चर्चा केली असता, नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव दिली पाहिजे, अशी आग्रही भूमिका विकास घरत यांनी मांडली.

विकास घरत म्हणाले की, वस्तुतः आमचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध नाही, परंतु त्यांचे नाव राज्यातील अन्य कुठल्याही वास्तूला देता येऊ शकेल. पण प्रकल्पग्रस्तांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे दि. बा. पाटील यांचे येथील कर्तुत्व ध्यानात घेतलेच पाहिजे. रायगड ही त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमीदेखील आहे. राजकारण आणि समाजकारण करत असता त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते, दोन वेळा खासदार, पाच वेळा आमदार असणार्‍या दि. बा. पाटील यांना स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त बांधव अत्यंत मानतो. आज याठिकाणी साडेबारा टक्के विकसित परतावा भूखंड प्रकल्पग्रस्तांना मिळाला ते केवळ दि. बा. पाटील यांच्याच मुळे. इतकेच नव्हे तर हा कायदा करून संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा आदर्श त्यांनी घालून दिला. आज येथील भूमिपुत्र ऐश्वर्या संपन्न जीवन जगत असेल तर ते केवळ दि. बा. पाटील यांच्या मुळेच. येथे सिडकोच्या माध्यमातून कॉलनी विकसित झाल्या असतील, पण त्यासाठी आमच्या जमिनी संपादित केल्या आहेत. दोन दशके पाठीमागे जाऊन पाहिल्यास आमच्या जमिनींचा योग्य मोबदला आम्हाला मिळालाय तो फक्त दि. बा. पाटील साहेबांमुळेच.

घरत पुढे म्हणाले की, आज येथील विभाग हा आगरी कराडी कोळी व अन्य बहुजन समाजबहुल आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली असता येथील बहुजन समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. आमच्या संस्कृतीची ओळख जपून ठेवण्यासाठीदेखील दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देणे संयुक्तीक होईल. त्यामुळे राज्य सरकारने येथील जनतेच्या भावनांचा आदर करत नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचा विचार करावा.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply