Breaking News

शिहूत सांडपाण्यामुळे भातशेती धोक्यात; शेतकर्‍यांचा आरोप

नागोठणे : प्रतिनिधी

येथील रिलायन्स कंपनीतून धरमतर खाडीकडे सांडपाणी वाहून नेणार्‍या पाईपलाईनला शिहू ग्रामपंचायत हद्दीतील आटीवली, गांधे भागात गळती लागली असल्याने काहीअंशी हातात आलेली भातशेती नष्ट होण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत रिलायन्स कंपनीच्या एका जबाबदार अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, त्यांनी त्यांचा भ्रमणध्वनी न उचलल्याचे कंपनीकडून कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

येथील रिलायन्स कंपनीतून निघणारे रसायनमिश्रित दूषित पाणी समुद्रात नेण्यासाठी कंपनी ते धरमतर खाडीपर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ही पाईपलाईन बहुतांशी या मार्गातील शेतांमधूनच टाकण्यात आली आहे. ही वाहिनी जीर्ण झाली असल्याने अनेकदा फुटत असते, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. या वर्षी तयार झालेले भाताचे पीक परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातातून गेले असताना, उरलेसुरले  पीकसुध्दा सांडपाणी वाहिनी फुटल्याने भिजले आहे, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. याचा फटका आटिवलीतील ठकीबाई हिरू पाटील, विठाबाई रामदास पाटील, शांताराम गोविंद पाटील, बाळाराम पदू पाटील, दामोदर कमळ्या म्हात्रे, यशवंत अंबाजी गदमले आणि गांधे गावातील हिराचंद्र हाशा गदमले, लता देवराम गदमले, भाऊ रामा गदमले या शेतकर्‍यांना बसला असल्याचे स्पष्ट होत आहे.

 येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत मोकल यांच्या म्हणण्यानुसार या वाहिनीतून रात्रीच्या दरम्यान उच्च दाबाने सांडपाणी सोडले जाते व या गळतीमुळे हे पाणी शेतात पसरते. ही सांडपाणीवाहिनी अनेकदा फुटत असल्याने शेती नापीक व्हायची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. वाहिनीची गळती झाल्यानंतर कंपनीकडून तुटपुंजी अशी नुकसानभरपाई दिली जात असल्याने हा प्रकार थांबविण्यासाठी आटीवली, गांधे, मुंढाणी, चोळे भागातील शेतकर्‍यांच्या सहकार्यातून लवकरच आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. शेत तलावातील मासळीसुध्दा या दूषित पाण्यामुळे मृत झाली असल्याचे एका शेतकर्‍याने सांगितले. शेतात कापून ठेवलेली भातशेती बाहेर काढण्यासाठी शेतात जाणे गरजेचे असते. मात्र, शेतात हे दूषित सांडपाणी साचून राहात असल्याने आत गेल्यावर अंगाला खाज सुटते, फोड येतात असे शेतकर्‍यांनी सांगितले. या सांडपाण्याचे नमुने घेतले असून प्रयोगशाळेत त्याची तपासणी करण्यासाठी पाठविणार असल्याचे वसंत मोकल यांनी या वेळी सांगितले.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply