Breaking News

खोपोलीतील गटार पाच वर्षे तुटलेले

प्रशासनाचे दुर्लक्ष, रहिवाशांत संताप

खोपोली : प्रतिनिधी

शंभर टक्के कर भरणा करणार्‍या रहिवासी वस्तीतील एक गटार मागील पाच वर्षे तुटलेल्या अवस्थेत आहे. स्थानिक नगरसेवक, नगरपालिका प्रशासन, मुख्याधिकारी व थेट नगराध्यक्ष यांना विनवणी करूनही या गटाराचे बांधकाम होत नसल्याने खोपोलीतील तीनशेहुन अधिक रहिवाशांत संताप व्यक्त होत आहे.

खोपोलीतील आशियाना इस्टेट या नोकरदार व मध्यमवर्गीय रहिवाशांची वस्ती असलेल्या सोसायटी लगतच्या डीपी रस्त्याच्या बाजूने सांडपाणी निचरा होण्यासाठी अर्धा किमी लांबीचे गटार आहे. पाच वर्षे दुर्लक्षित असलेले हे गटार विद्यमान स्थितीत नाल्यात रूपांतरीत झाले आहे. पुर्वी आरसीसी बांधकाम असलेल्या या गटाराची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या गटाराची साफसफाई होत नाही. परिणामी परिसरात दुर्गंधी, डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

या गटाराचे बांधकाम व गटार बंदिस्त होण्यासाठी येथील रहिवासी मागील चार वर्षांपासून स्थानिक नगरसेवक, आरोग्य विभाग, नगर परिषदेचा बांधकाम विभाग, प्रशासन, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना विनवणी करीत आहेत. मात्र अद्याप त्याची दखल घेण्यात आली नाही. आता या सोसायटीमधील तीनशे हुन अधिक रहिवाशांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र कोरोना व लॉकडाऊन असल्याने हे आंदोलन सध्या स्थगित ठेवण्यात आले आहे.

नगर परिषदेकडून गटार बांधकाम व बंदिस्त होण्याची कार्यवाही न झाल्यास आगामी काळात नगर परिषदेविरोधात असहकार आंदोलन करण्याचा संकल्प रहिवाशांनी केला आहे. दरम्यान, नगर परिषद बांधकाम विभागाकडून सदर गटाराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, तो तांत्रिक मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.

तुटलेल्या गटारामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे अस्वच्छता व रोगराईचा प्रश्न निर्माण झाला आहे.

-सुहास सेलूकर, रहिवासी, आशियाना इस्टेट सोसायटी खोपोली

शंभर टक्के कर भरणा करूनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे आगामी काळात नगरपालिका विरोधात असहकार आंदोलन केले जाईल .

-मिलिंद चव्हाण, सचिव, आशियाना इस्टेट सोसायटी खोपोली

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply