महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या अद्याप कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे तर प्रशासकीय यंत्रणा शहरातील वाढती गर्दी रोखण्यात हतबल ठरली आहे. महाड शहरातील बँकांमधील गर्दी कायम आहे. याबाबत सुरुवातीपासूनच बँकांनी कोणतीच उपाययोजना केलेली दिसत नाही शिवाय सुरक्षित सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग)देखील ठेवले जात नसल्याने कोरोना रोखण्यात बँकांचा प्रशासनाला असहकार असल्याचे दिसून येत आहे.
महाड तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अधिक आहे. महाड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने याठिकाणी बाजारपेठ, शासकीय कामकाज, बँका, अन्य कामासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने लोक येतात. दुकाने सुरु असल्याने शहरात गर्दी होवू लागली आहे. कारवाई शिथिल झाल्याने विविध ठिकाणी नियामंचे उल्लंघन केले जात आहे. महाड शहरात बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या शासकीय व अन्य खाजगी बँका कार्यरत आहेत. यापैकी बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन बँकांमध्ये पेन्शन, कर्जाचे हप्ते, पैशांची देवाणघेवाण होत असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र बँक प्रशासनाने कोरोनाविषयक नियमांबाबत कोणतीच उपाययोजना केलेली दिसत नाही. बँकामध्ये होणारी गर्दी आणि न पाळले जाणारे सुरक्षित सामाजिक अंतर यामुळे बँकांवर कारवाई केली जावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. मात्र याकडे प्रशासनानेदेखील दुर्लक्ष केले आहे.