Breaking News

नेरळ ग्रामपंचायत सत्ताबदलाच्या उंबरठ्यावर

सध्याची नेरळ ग्रामपंचायतमधील राजकीय स्थिती पाहता शिवसेनेकडे सात, तर भाजप-राष्ट्रवादी-शेकाप यांच्याकडे स्वतःचे नऊ आणि सेनेला रामराम करून आरपीआयमध्ये प्रवेश केलेले एक तसेच सेनेच्या नेरळ ग्रामपंचायतमधील सदस्यांच्या गोटात घेतला जात नसलेला एक सदस्य असे 11 सदस्य आज सत्ताधारी गटाकडे आहेत. सेनेकडे हक्काचे सात सदस्य असून नजीकच्या काळात नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची निवडणूक होईल आणि त्या वेळी शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी दोन सदस्यांची गरज भासणार आहे. हे गणित शिवसेना कसे जुळविणार? याचे उत्तर कर्जत तालुक्याच्या शिवसेना नेतृत्वाकडे असेल काय? हे येणारा काळच ठरवणार आहे. पूर्वीचे विरोधी पक्ष व आता सत्ताधारी बनलेले भाजप, शेकाप, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या पॅनलमधून निवडून आलेले आणि आता सत्ताधारी प्रभारी सरपंच यांच्याबरोबर असलेले धर्मानंद गायकवाड, शिवाली रासम-पोतदार यांच्यामुळे सत्ताधारी गटाचे संख्याबळ 11 झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष चिन्हे नसल्याने पक्षांतर बंदीचा कायदा ग्रामपंचायत सदस्यांना लागू होत नाही. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतचे सरपंचपद मिळविण्यासाठी शिवसेना व सध्याच्या सत्ताधारी गटात जोरदार राजकीय खेळी अपेक्षित आहे. त्यात मानिवली ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी थेट सरपंच शेकापचे नेते प्रवीण पाटील यांच्या निधनानंतर तेथील शेकापच्या सदस्यांनी अन्य पक्षात प्रवेश करून मिळवलेले सरपंचपद हा तेथील राजकीय अनुभव नेरळच्या स्थानिक राजकीय पक्षांनादेखील विसरून चालणार नाही.त्यामुळे नेरळमध्येही अशी राजकीय खेळी होण्याची शक्यता आहे.उपसरपंचपद न दिल्याने दुखावलेल्या भाजपचे सदस्य शिवसेनेकडे जाण्याची अजिबात शक्यता नाही. उलट नेरळ ग्रामपंचायत शिवसेनेच्या हातातून घेण्यासाठी भाजपने कंबर कसल्याचे मागील काही दिवस सुरू असलेल्या राजकीय घडामोडींतून दिसत आहे. या सर्व घडामोडी प्रामुख्याने शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता असून शिवसेनेला रावजी शिंगवा यांच्या निधनाने ग्रामपंचायतीच्या सत्तेवरून प्रभारी सरपंचपदानंतर नव्याने होणार्‍या सरपंचपदाच्या निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. सेनेच्या हातातून नेरळ ग्रामपंचायत गेल्यास त्याचे राजकीय पडसाद शिवसेनेच्या वर्तुळात उमटू शकणार आहेत.कारण नेरळकर मतदारांनी युतीला दिलेली सत्ता ते टिकवू शकले नाहीत आणि त्यातही आपल्या पक्षाच्या पॅनलमधून निवडून आलेल्या सदस्यांनाही शिवसेना नेतृत्व सांभाळून घेऊ शकले नाही. जानेवारीत दामत-भडवळ ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेला बहुमत मिळाले होते, मात्र तेथे नेतृत्वाने लक्ष दिले नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा सरपंच-उपसरपंच दामत-भडवळसारख्या मोठ्या ग्रामपंचायतमध्ये विराजमान झाला आहे.

अनुसूचित जमातीचे तीन सदस्य : नेरळ ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते आणि नेरळ ग्रामपंचायतीमधील 17 सदस्यांमध्ये तीन सदस्य हे अनुसूचित जमातीचे आहेत. त्यात उषा पारधी ह्या शेकापच्या पॅनलमधून निवडून आलेल्या सदस्या भाजपचे तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांची साथ देत आहेत, तर पार्वती पवार व नितीन निरगुडा हे दोन सदस्य शिवसेनेच्या जवळ आहेत. त्यामुळे आगामी काळात या तिघांपैकी नेरळचा सरपंच कोण होणार, याकडे नेरळकरांचे लक्ष लागून राहिले आहे. (समाप्त)

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply