बारा-तेरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तेव्हा बंद दाराआड या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल याबद्दल अनेक तर्कवितर्क करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीनंतरच महाराष्ट्रात वेगाने राजकीय घडामोडी घडू लागल्या. पाठोपाठ महाविकास आघाडीचे जनक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार रविवारी दिल्लीत जाऊन धडकले. हा निव्वळ योगायोग म्हणता येईल? मध्ययुगीन लढायांमध्ये पराभूत राजा किंवा संस्थानिक जेत्याच्या राहुटीमध्ये शरणागतीचा पांढरा रूमाल पाठवत असे किंवा स्वत: अजिंक्य राजासमोर हजर होत असे. नंतर तहाची बोलणी होत असत. तसाच काहिसा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या घडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांतील घटनाक्रम पाहिला तर महाविकास आघाडीला लागलेली अखेरची घरघर राजकारणामधील जाणत्यांना सहज ऐकू येईल. शिवसेनेचे वादग्रस्त आमदार प्रताप सरनाईक यांनी 10-12 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शरणागतीचा जणू पहिला मसुदाच पेश केला. तपास यंत्रणांच्या ससेमिर्यामुळे माझ्यासारख्या काही आमदारांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत असून भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेतल्यास सारेकाही ठीक होऊ शकते, अशा आशयाची विधाने त्या पत्रात करण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही सहकारी पक्षांनीच शिवसेनेचे नेते फोडण्याचे उद्योग चालवल्याचा आरोपही त्या पत्रात करण्यात आला आहे. सरनाईक यांच्या त्या पत्रामुळे महाविकास आघाडीला प्रचंड हादरे बसले. प्रसिद्धिमाध्यमांनी तर त्याचे लेटरबॉम्ब असेच वर्णन केले. या लेटरबॉम्बमुळे शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा भाजपशी जवळीक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या की काय अशी चलबिचल निर्माण झाली आहे. या सार्या प्रकरणाला सुरुवात कुठून झाली हे आधी तपासले पाहिजे. सरनाईक यांच्यामागील तपास यंत्रणांचा ससेमिरा काही महिन्यांपूर्वीच सुरू झाला आहे. भाजपच्या दबावामुळे त्याआधी शिवसेनेच्याच वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. सरनाईक यांना तुरुंगाचे दरवाजे दिसू लागल्यामुळे त्यांनी शरणागतीची ही भाषा सुरू केल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेसविरहित भाजपविरोधी तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या दृष्टीने राजधानी दिल्लीत ज्या राजकीय उठाबशा चालू आहेत, त्याचा भाग म्हणून शरद पवार यांच्या दिल्ली दौर्याकडे पाहिले जात आहे, परंतु हे सारे दिसते तेवढे सोपे व सरळ नसावे. मुख्यमंत्र्यांची दिल्ली भेट, काँग्रेसचा स्वबळाचा नारा, सरनाईक यांचा लेटरबॉम्ब आणि पवार यांचा दिल्ली दौरा या घटनाक्रमाकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला हवे. जरा बारकाईने बघितले तर असे लक्षात येते की सत्ताधारी महाविकास आघाडीला लवकरच अखेरचा तडाखा मिळेल अशी ही चिन्हे आहेत. अर्थात महाविकास आघाडीचे नेते हे मान्य करणार नाहीत. आमचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते करीत असले तरी वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे जनतेला आता कळून चुकले आहे. गेल्या दीड वर्षामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्विरोध या न त्या कारणाने अनेकदा पुढे आला आहे. कोरोनाच्या लाटांचा ढालीसारखा उपयोग करून हे सरकार कसेबसे तग धरू शकले. यापुढे मात्र परिस्थिती खडतर होणार आहे हेच सरनाईक यांच्या लेटरबॉम्बरूपी पांढर्या निशाणामुळे ढळढळीतपणे समोर आले आहे.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …