अरुणराव दाते : सामाजिक कार्याला वाहून घेतलेले संघ कार्यकर्ते

रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे कुलाबा जिल्हा अध्यक्ष अरुणराव दाते यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख. रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे कुलाबा जिल्हा अध्यक्ष अरुण माधव दाते यांच्या वयाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत, हे सांगून कुणाला खरं वाटणार नाही. तरुणांना लाजवेल असा उत्साह आणि क्रियाशीलता आजही त्यांच्या ठिकाणी ओसंडून वाहत आहे. अरुणराव हे ज्येष्ठ संघ प्रचारक दामूअण्णा दाते यांचे धाकटे बंधू. वडिलांची फिरतीची नोकरी, त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्या वेळी ज्येष्ठ संघ कार्यकर्ते श्रीपती शास्त्री यांच्याबरोबर एका खोलीत राहण्याचा योग आला. अनेक संघ कार्यकर्त्यांच्या सहवासामुळे त्यांचा सामाजिक, राष्ट्रीय कार्याबद्दलचा विचारांचा पाया पक्का झाला. नंतर मुंबईच्या व्होल्टास कंपनीत नोकरी लागली, मात्र थळ येथे राहणारे दोन्ही बंधू अचानक मृत्यू पावले. घरी आई, वडील व मोठी वाडी, ती सांभाळण्यासाठी कोणी नव्हते. त्यामुळे व्होल्टासमधील चांगली नोकरी सोडून अरुणरावांनी थळला राहण्याचा निर्णय घेतला. सौ. दाते वहिनींनीही या निर्णयात त्यांना आनंदाने साथ दिली. अरुणरावांनी दोन्ही विधवा वहिनींना वडिलोपार्जित हिस्सा देऊन त्यांचे पुनर्विवाहही करून दिले. आजही त्यांच्या कुटुंबीयांशी अरुणरावांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. याबाबत कै. दामूअण्णांचे मार्गदर्शन होतेच तरीही त्यांचा प्रगल्भ व न्याय्य विचार मला विशेष भावतो. पुढे अरुणरावांना अलिबागेत महाराष्ट्र बँकेत नोकरी मिळाली. त्याकाळी भारतीय मजदूर संघ प्रणित बँक कर्मचारी संघटनेचे त्यांनी कोकण विभागात प्रवास करून काम केले. माझा त्यांचा प्रथम परिचय 1983 साली मी आरसीएफमध्ये नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलो तेव्हा झाला. दामूअण्णांनीच आवर्जून त्यांच्याकडे जाण्यास सांगितले होते. त्यावेळेपासून अरुणरावांचे घर माझेच झाले. 12 वर्षे मी थळमध्येच राहत होतो. त्या काळात संघाच्या कामात व वैयक्तिकही त्यांनी मला सर्व प्रकारे मदत केली. कै. दामूअण्णा विश्रांतीसाठी वर्षातून एकदा तरी थळला येत. त्यांच्यामुळे अनेक मोठे कार्यकर्ते थळ येथे येत असत. सर्वांशी विशेषतः सौ. दाते वहिनींच्या वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळ्या चर्चा होत असत. कै. दामूअण्णा संघकामासाठी महाराष्ट्र प्रांतात सर्वत्र प्रवासात असल्याने थळमधील अनेकांना त्यांची ओळख करून देण्याचे भाग्य मला लाभले. पुढे अलिबाग येथे रायगड प्रबोधिनी नावाने संघ कार्यालय सुरू झाले. त्यात अरुणराव उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. 1999पासून रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे ग्राम आरोग्य रक्षक योजनेचे मोठ्या प्रमाणात काम सुरू झाले. तेव्हापासून त्यांनी जिल्हा कोषाध्यक्ष जबाबदारी आनंदाने स्वीकारली. कोषाध्यक्ष असल्याने जिल्ह्याचे हिशेब सर्वांत प्रथम प्रांतास जातात. ते पाठवायला वेळ लागला तर ते खूप अस्वस्थ होतात. आठवड्यातून एक दिवस ते नियमित केंद्रावर जातात. या केंद्रामुळे अलिबाग शहरात जनकल्याण समिती सर्वांना माहिती झाली व अनेक सहानुभूतीदारही तयार झालेत. राजा टिल्लू, लेले, दिवेकर, सुतार, शेट्ये असे नवीन कार्यकर्ते यामुळेच जनकल्याण समितीला मिळाले. प्रवास व लाँग ड्राइव्हची त्यांना विशेष आवड. त्यांच्याबरोबर आम्ही दोनदा पूर्वांचल प्रवास केला.आज अरुणराव रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे कुलाबा जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतात. कडक स्वभावामुळे त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती माझ्या व अन्य कार्यकर्त्यांच्या मनात कायम आहे. बैठक वा प्रवासासाठी ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिटे जरी उशीर झाला तरी लगेच त्यांचा फोन आलाच म्हणून समजा. अरुणरावांना दीर्घायू लाभो व त्यांचे मार्गदर्शन आम्हाला असेच मिळत राहो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.

 -अविनाश धाट (लेखक रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे कोकण संभाग कार्यवाह आहेत.)

Check Also

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami W dzisiejszym artykule skupimy się na tym, …

Leave a Reply