पनवेल : रामप्रहर वृत्त
मुंबई व विशेषत्वाने कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पळस्पे ते इंदापूर महामार्गातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी (दि. 30) सकाळी 8 वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे होणार आहे. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रवींद्र चव्हाण, राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या महामार्गातील काही टप्प्यामध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि दरवर्षी डांबरीकरणावर होणारा कोट्यवधींचा खर्च टाळण्यासाठी काँक्रीटीकरणाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी करून त्यांनी तातडीने निधी मंजूर केला. त्या अनुषंगाने मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते कासु सेक्शनमधील 42.30 किमी रस्त्याचे काँक्रीटीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 डीडी राजेवाडी फाटा ते वरंध गाव या 13 किमी रस्त्याचे काँक्रीटीकरणासह दुपदरीकरण करणे, तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 डीडी वरील वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द या 8.60 किमी. रस्त्याचे काँक्रीटीकरणासह दुपदरीकरण करणे अशा एकूण 64 किमी रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार असून यासाठी 414.68 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
वाहनचालक आणि प्रवाशांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेल्या या समारंभाला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रवीशेठ पाटील, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी यांनी केले आहे.
Check Also
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ
शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …