Breaking News

संशयाचे धुके गहिरे

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणातील गूढ वाढतच चालल्यासारखे भासते आहे. दीड महिन्याहून अधिक काळ तपास करूनही मुंबई पोलिसांनी या प्रकरणी काहीही ठोस माहिती उजेडात आणल्याचे दिसले नाही. सीबीआय तपासाची मागणीही ठाकरे सरकारकडून सातत्याने फेटाळून लावण्यात आली. आणि आता तर त्यांनी तपासासाठी आलेल्या बिहारच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यालाच बळजबरीने क्वारंटाइन केल्याचा आरोप होतो आहे.

पाठिशी कुणाही गॉडफादरचे बळ नसताना, निव्वळ आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर बॉलिवुडमध्ये यशस्वीपणे भरभक्कम पाय रोवणार्‍या अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या कथित आत्महत्येमागील गूढ दीड महिना झाला तरी उलगडलेले नाही. कारकीर्द ऐन भरात असताना त्याने मृत्यूला का बरे कवटाळले, याचे उत्तर देशभरातील त्याच्या चाहत्यांना हवे असताना त्याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाचा मात्र तमाशा झालेला दिसतो आहे. वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी त्याने कथित आत्महत्या केल्याचे 14 जून रोजी समोर आल्यापासून मुंबई पोलिसांनी जाबजबाब नोंदवण्याचा सपाटा लावला खरा, परंतु गेल्या दीड महिन्याच्या काळात तब्बल 40 हून अधिक जणांचे जाबजबाब नोंदवल्यानंतरही मुंबई पोलिसांचा तपास नेमक्या कोणत्या दिशेने जातो आहे हे काही स्पष्ट झालेले नाही. मुळात सुशांतच्या अकस्मात मृत्यूनंतर बॉलिवुडमधील एका कंपूच्या षड्यंत्रातून त्याचा बळी गेल्याची बरीच चर्चा झाली होती. या चर्चेत जी नावे घेतली गेली त्यापैकी अनेकांचे जाबजबाबही मुंबई पोलिसांनी नोंदवले, परंतु त्यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती पोलिसांनी अद्याप तरी उघड केलेली नाही. महिनाभराहून अधिक काळ लोटूनही नेमके काहीच बाहेर येत नसल्याने बिहारमध्येच नव्हे तर देशभरातील चाहत्यांकडून सुशांतला न्याय मिळावा याकरिता याप्रकरणीचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी सुरू झाली. परंतु राज्यातील ठाकरे सरकार सीबीआय तपासाबाबत सुरूवातीपासूनच अनुकुल नव्हते. मुंबई पोलीस याप्रकरणीचा तपास करण्यास सक्षम आहेत ही एकच री ते ओढत राहिले. पण सुशांतच्या कुटुंबियांनी बिहारमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडविरोधात तक्रार नोंदवल्यानंतर मात्र बिहार पोलीस तपासाकरिता मुंबईत येऊन दाखल झाले. गेला आठवडाभर बिहार पोलिसांची ही टीम मुंबईत अनेकांच्या भेटीगाठी घेऊन तपास करत होती. परंतु रविवारी पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी या तपासकामाचे नेतृत्व करण्यासाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर मात्र मुंबई महापालिकेकडून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. आधी दाखल झालेल्या बिहार पोलिसांच्या टीमला महत्त्वाची कागदपत्रे व पुरावे मिळवण्यात अडचणी येत असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी तिवारी मुंबईत आल्याचे सांगितले जाते. त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संबंधित प्रकरणीच्या बैठकीनंतर क्वारंटाइन करण्यात आल्याकडेही बोट दाखवले जाते आहे. याप्रकरणी अनेक राजकीय नेत्यांनीही राज्य सरकारवर आरोप केले आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे अकारण याप्रकरणीचे गूढ वाढून तपासाविषयी संशयाचे वातावरण निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे, जी अतिशय योग्य अशीच आहे. फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे, अलीकडच्या काळात केरळ, उत्तर प्रदेश येथील वैद्यकीय व पोलीस पथके राज्यात व मुंबईत येऊन गेली आहेत. यापैकी कुणालाही क्वारंटाइन करण्यात आले नाही. मग आता बिहार पोलिसांतील वरिष्ठ अधिकार्‍याबाबतच असे का व्हावे हा प्रश्न रास्तच आहे. ही केस पूर्णत: आपल्याच हातात ठेवण्याचा इतका टोकाचा अट्टहास कशासाठी?

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply