Breaking News

ट्रेडिंग करताना महत्त्वाचा कल दाखविणार्‍या ‘कॅण्डलस्टिक’!

कोरोना साथीमध्ये अनेक जण शेअर बाजारात ट्रेडिंग करू लागले आहेत. ट्रेडिंग करताना जगभर वापरले जाणार्‍या तांत्रिक विश्लेषणाचे महत्त्व आपण गेल्या वेळी जाणून घेतले.आता हे विश्लेषण करताना ज्या ‘कॅण्डलस्टिक’चा अभ्यास करावा लागतो, त्या ‘कॅण्डलस्टिक’चे प्रमुख प्रकार आपण पाहूयात.
आपण टेक्निकल अ‍ॅनालिसिस म्हणजे काय व आलेखाचे प्रमुख प्रकार कोणते ते मागील लेखात पाहिले, तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत ते म्हणजे सर्वांत प्रचलित अशा कॅण्डलस्टिक आलेखातील कॅण्डलस्टिकचे विविध प्रकार. आता यातदेखील दोन प्रमुख प्रकार आहेत. तेजी दर्शवणारे कॅण्डलस्टिक्स प्रकार व मंदी दर्शवणारे कॅण्डलस्टिक्स प्रकार. ही गोष्ट लाल व हिरवी कॅण्डल असणं यापेक्षा वेगळी आहे हे इथं लक्षात ठेवू. जर त्या कॅण्डलचा बंद भाव हा उघडत्या भावापेक्षा जास्त असेल तर ती कॅण्डल आलेखावर हिरव्या किंवा पांढर्‍या (पारदर्शक) रंगात दर्शवली जाते व त्यास तेजीची अथवा bullish कॅण्डल असं संबोधलं जातं. याउलट जर एखाद्या कॅण्डलचा बंद भाव हा त्याच्या उघडत्या भावापेक्षा कमी असेल तर अशी कॅण्डल आलेखावर लाल अथवा काळ्या रंगात दर्शवली जाते व त्यास मंदीची किंवा bearish कॅण्डल असं संबोधलं जातं.
टेक्निकल अ‍ॅनालिसिसमध्ये कॅण्डलस्टिकचे अनेक प्रकार आहेत, परंतु प्रमुख प्रकारच येथे विचारात घेत आहे.

  1. बुलीश एंगल्फिंग (Bullish Engulfing) –
     या प्रकारात एखादी कॅण्डल ही bullish असून त्या कॅण्डलची मुख्य बॉडी त्याच्या मागील कॅण्डलला व्यापून टाकते. याचा अर्थ मागील कॅण्डलपेक्षा या कॅण्डलमधे (खुलता भाव व बंद भाव यादरम्यान) जास्त हालचाल होऊन ती बंद होताना मागील कॅण्डलपेक्षा वरील बाजूस म्हणजेच मागील कॅण्डलच्या भावापेक्षा अधिक भावांनं बंद झालेली आहे.
  2. बेअरिश एंगल्फिंग (BearishEngulfing) –
    अगदी वरील प्रकारच्या उलट अशी ही कॅण्डल असते. फक्त यात आधीची कॅण्डल ही तेजीची असून नंतरची कॅण्डल ही मंदीची असते व मंदीच्या कॅण्डलची व्याप्ती ही मागील तेजीच्या कॅण्डलच्या बॉडीपेक्षा जास्त असते.
  3. बुलीश हरामी (Bullish Harami) –
     ही कॅण्डल दिसण्यात अगदी बुलीश एंगल्फिंगच्या विरुद्ध असते म्हणजे मागील कॅण्डलच्या मुख्य बॉडीपेक्षा या कॅण्डलची बॉडी थोडी लहान असते, परंतु या कॅण्डलचा खुलता भाव हा मागील कॅण्डलच्या बंद भावापेक्षा वर (अधिक) असतो. याचा अर्थ मागील कॅण्डलच्या बंद भावापेक्षा याचा खुलता भाव वरील बाजूस आहे, म्हणजे तात्पुरता उतरता कल थांबलाय.
  4. बेअरिश हरामी (Bearish Harami) –
     या प्रकारात मागील कॅण्डल ही बुलीश मोठी कॅण्डल असून ही कॅण्डल त्यानंतरची छोटी बॉडी असलेली बेअरिश कॅण्डल असते.
  5. हॅमर (Hammer) –
     या प्रकारात या कॅण्डलचं स्वरूप अगदी हॅमर म्हणजे हातोडीसारखं असतं. म्हणजे मुख्य बॉडी छोटी व पाय (leg) किंवा शॅडो मोठा असते. याचा अर्थ ही कॅण्डलभाव उघडल्यानंतर बरीच खाली येऊन खरेदीच्या आधारामुळे खाली न टिकता पुन्हा जेथे उघडली होती, त्या आसपास बंद झालीय. ही कॅण्डल ढोबळमानानं कलबदल (ट्रेंड रिव्हर्सल) दाखवते. हॅमर ही बुलीश कॅण्डल असून सर्वसाधारणपणे त्याचे महत्त्व उतरत्या कलात आल्यास वाढते. कारण उतरत्या कलात भाव खाली जाऊन बंद होताना पुन्हा भाव खुलत्या भावाच्या वर बंद होत आहे. यातच जर ही कॅण्डल लाल असेल तर त्यास हँगिंग मॅन म्हणतात.
  6. उलटी (inverted) हॅमर –
     यामध्ये हॅमरचं डोकं (मुख्य छोटी बॉडी) खाली तर पाय वरती असतो. वरील प्रकारच्या बरोबर उलट याचा अर्थ लावू शकतो म्हणजे भाव उघडल्यानंतर भाव वरती गेला पण विक्रीचा दबाव आल्यानं पुन्हा बंद होताना खुलत्या भावाच्या आसपास बंद झाला. हादेखील कलबदलाचाच नमुना आहे. साधारणपणे याचं महत्त्व चढत्या कलाच्या (Up down) शेवटी आल्यास वाढतं.
  7. दोजी (Doji) –
     या प्रकारातदेखील मुख्य बॉडी ही अगदी बारीक असून पाय हे त्या प्रमाणात मोठे असतात. ही कॅण्डल ही कोणताच निष्कर्ष काढू देत नाही. त्यामुळे नेहमी यानंतरच्या कॅण्डलला महत्त्व दिलं जातं.
  8. पिअर्सिंग (Piercing) –
     हादेखील एक कलबदल दर्शक नमुना ठरू शकतो. या प्रकारात मुख्य बॉडी ही मोठी हवी. बुलीश पिअर्सिंग या प्रकारात चालू कॅण्डलचा बंद भाव हा मागील बेअरिश कॅण्डलच्या मुख्य बॉडीच्या निम्म्याहून अधिक पाहिजे.
  9. मॉर्निंग स्टार –
    या प्रकारात छोटी बॉडी असलेली कॅण्डल ही एका मोठ्या लाल कॅण्डलनंतर आल्यास व त्यानंतर पुन्हा हिरवी (तेजी) कॅण्डल आल्यास हा कलबदल असू शकतो.
  10. इव्हनिंग स्टार-
     मॉर्निंग स्टारच्या बरोबर उलटा प्रकार म्हणजे इव्हनिंग स्टार. याचा अर्थ आपण पुढील अवधीत भाव घसरू शकतात असं अनुमान काढू शकतो.
  11. स्पिनिंगटॉप्स –
     या प्रकारातही कॅण्डलस्टिकची मुख्य बॉडी ही छोटी असते, परंतु दोजी प्रकारापेक्षा थोडी मोठी असते व पाय हेदेखील फार मोठे नसतात. हा प्रकार प्रामुख्यानं एका कलाच्या शेवटास पहावयास मिळतो.
    या मुख्य प्रकारांव्यतिरिक्त थोड्याफार फरकानं विविध प्रकार पाहायला मिळतात. अर्थात हा अंदाज असतो. बाजार वर जाण्यास किंवा खाली येण्याला कारणीभूत ठरलेली एखादी मोठी घटना त्याच वेळी घडलेली असेल तर हा अंदाज चुकू शकतो याचे भान ठेवले पाहिजे. त्यामुळेच शेअर वर जाणार किंवा खाली येणार असेल तर त्याला स्टॉपलॉस लावण्याची पद्धत आहे. तो न लावता ट्रेडिंग केले तर मोठ्या नुकसानाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते.
  • प्रसाद ल. भावे

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply