मोहोपाडा : रामप्रहर वृत्त – रसायनीतील डॉक्टरांची प्रायमा असोसिएशन आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनी व आसपासच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या सात शाळांतील तिनशे गरजू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. डॉक्टर संघटनेच्या या उपक्रमाचे शालेय शिक्षकांनी व पालकांनी कौतुक केले.
जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचण येऊ नये याकरिता रसायनीतील डॉक्टरांची प्रायमा संघटना अधिक लक्ष देत असते. या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात हातभार लागावा याकरिता रसायनी प्रायमा डॉक्टर असोसिएशन आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने मोहोपाडा येथील जनता विद्यालय शाळेच्या सभामंडपात परिसरातील जिल्हा प्राथमिक शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. रसायनी प्रायमा डॉक्टर असोसिएशनच्या या कार्यक्रमाचे शालेय मुख्याध्यापक व शिक्षकांनी आभार मानले.
जिल्हा परिषदांच्या वासांबे मोहोपाडा, गुलसुंदेवाडी, लाडीवलीवाडी, सवणेवाडी, खुटलवाडी, जांभिवलीवाडी, जनता विद्यालय मोहोपाडा मराठी माध्यम आदी शाळांतील गरीब व गरजू अशा तिनशे विद्यार्थ्यांना दप्तर, प्रत्येकी चार वह्या, कंपासपेटी साहित्यासह, खाऊ व इतर वस्तूंचे वाटप मान्यवर डॉक्टरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाला रायगड मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. सुनील डोंगरे, रसायनी प्रायमा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल यादव, डॉ. युवराज म्हशीलकर, डॉ. काटदौड, डॉ. महादेव शिंदे, डॉ. संजय कुरंगले, डॉ. रामदास लबडे, डॉ. ठाकूर, डॉ. नलिन शहा, डॉ. विशालाक्षी शेडबाले, डॉ. राजन बागडे, डॉ. धिरज जैन, डॉ. प्रतिभा महिंद्रकर, डॉ.रोहित कदम, डॉ. डोंगरे, डॉ. विकास, जितू, दीपक, प्रशांत, राहुल, श्रद्धा, हिरा, प्रतिभा, तुषार, डॉ. पाटील आदीसह रायगड मेडिकल असोसिएशन सदस्य, लाईफकेअर लॅबोरेटरी, शालेय मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा महिंद्रकर यांनी केले.