भारतात 30 कोटी डोसचे नियोजन
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट यांनी येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये भारताकडे अजून एका लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा सुरू होऊ शकणार आहे.
भारतात वर्षाला स्पुटनिक व्ही लसीचे 30 कोटी डोस तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सिरम इन्स्टिट्युट सप्टेंबरमध्ये स्पुटनिक व्हीच्या उत्पादनाला सुरुवात करणार आहे. काही इतर भारतीय उत्पादकही उत्पादनासाठी तयार आहेत, अशी माहिती रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे (आरडीआयएफ) सीईओ कायरिल दिमित्रिएव्ह यांनी ‘एएनआय’शी बोलताना दिली.
सीरम इन्स्टिट्यूट ही कोरोना लस उत्पादनाची जगातील सर्वांत मोठी कंपनी आहे. या कंपनीने आतापर्यंत 500 दशलक्षहून अधिक डोस बनवले आहेत. स्वत:ची लस बनवण्याव्यतिरिक्त कंपनी एस्ट्राझेनेका-ऑक्सफर्डद्वारे विकसित केलेली कोविशील्ड, नोवोवॅक्सद्वारा विकसित कोवोवॅक्सची निर्मितीही करीत आहे तसेच ब्रिटनची लस कोडाजेनिक्सचे परीक्षण करीत आहे.
स्पुटनिक लसीच्या निर्मितीसाठी आरडीआयएफसोबत काम करण्याबाबत मी आनंदी आहे. आम्हाला आशा आहे की, सप्टेंबर महिन्यामध्ये ट्रायल बॅच सुरू होण्यासोबतच येणार्या महिन्यांमध्ये लाखो डोस उपलब्ध होतील.
-अदर पुनावाला, सीईओ, सीरम इन्स्टिट्यूट