नवी मुंबई ः वार्ताहर
नवी मुंबई शहरात पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारक जागा मिळेल तेथे वाहने पार्क करीत आहेत. परिणामी नियोजनबद्ध शहरातील रस्त्यांना वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले असताना आता वाहनधारकांनी चक्क मनपाच्या कोपरखैरणे येथील विभाग कार्यालयाच्या आवारातच खासगी वाहनांचे पार्किंग सुरू केले आहे. येथे रोज संध्याकाळी आजूबाजूच्या नागरी वस्तीमधील रहिवासी वाहने पार्किंग करतात. काही वाहने तर चार चार दिवस एकाच जागेत पार्किंग केल्याने त्याचा फटका मनपाच्या अधिकारी व कर्मचारीवर्गाला सहन करावा लागतो. याआधी रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी केली जात असतानाच आता ई विभाग कार्यालयाच्या आवारातच खासगी वाहनांचे पार्किंग सुरू झाले आहे. चारचाकी, रिक्षा, कार, दुचाकी, टुरिस्ट गाड्या, टेम्पो उभे केल्याचे दिसून येते. या प्रकाराला आताच निर्बंध घातला नाही तर ई विभाग कार्यालयाचे आवार खासगी वाहनतळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खासगी गाड्या सकाळी न काढल्यामुळे सफाई कामगारांना कचरा काढण्यात अनेक अडचणी येतात. नवी मुंबई शहरातील वाहन पार्किंगचे नियोजन फसल्याचे याअगोदरच स्पष्ट झाले आहे. वसाहती निर्माण करताना संभाव्य वाहनांचा अंदाज घेतला नाही. त्यामुळे पार्किंगचे नियोजन करण्यात आले नाही. त्याचा फटका शहरवासीयांना सहन करावा लागत आहे.
मला भेटायला येणारे नागरिक रस्त्यावर वाहने लावतील का? या ठिकाणी सरकारी कार्यालय, बँक आहे. त्यामुळे वाहने पार्क केली जात आहेत. आम्ही जॅमर लावून कारवाई करतो, तसेच कारवाईत डम्पिंगला वाहने जमा केली आहेत.
-अशोक मढवी, विभाग अधिकारी, कोपरखैरणे
विभाग कार्यालय बंद होताच या ठिकाणी खासगी वाहनांची एण्ट्री होते. दुचाकी, चारचाकी, टेम्पो आधी वाहने पार्क केली जातात. कार्यालय सुरू असताना आम्ही मान्य करतो, पण कार्यालय बंद झाल्यावरही वाहने उभी असतात. -प्रदीप म्हात्रे, अध्यक्ष, दिव्या दीप फाऊंडेशन