Breaking News

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक महोत्सव

नियोजन बैठकीतून आढावा

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार भारतीय युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होणार आहे. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा, कला व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेसंदर्भात रविवारी (दि. 14) कामोठ्यात नियोजन बैठक झाली.
नमो चषक अंतर्गत नुकताच सायक्लोथॉन व मॅरेथॉन स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात झाली. त्यानंतर आता 15 ते 23 जानेवारीपर्यंत रांगोळी स्पर्धा (ऑनलाईन), 15 ते 25 जानेवारीपर्यंत कळंबोली येथे केईएल कॉलेजजवळच्या भव्य मैदानावर खुल्या गटातील दिवस रात्र भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा, 15 ते 23 जानेवारीपर्यंत पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर मंडलात चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, 16 ते 18 जानेवारीपर्यंत पनवेल तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर फुटबॉल स्पर्धा, 18 जानेवारीला कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या मैदानावर कुस्ती स्पर्धा, 19 ते 21 जानेवारीपर्यंत सीकेटी कॉलेज खांदा कॉलनी आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर येथे गायन व नृत्य स्पर्धा, 19 जानेवारीला लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल कामोठे येथे कबड्डी स्पर्धा, 20 जानेवारीला लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल कामोठे येथे बुद्धिबळ व खो-खो स्पर्धा, 20 जानेवारीला सीकेटी कॉलेज खांदा कॉलनी येथे व्हॉलीबॉल स्पर्धा, 20 ते 21 जानेवारीला लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल कामोठे येथे कॅरम स्पर्धा, 20 ते 21 जानेवारीला रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उलवे नोड येथे बॅडमिंटन स्पर्धा, 21 जानेवारीला लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल कामोठे येथे रस्सीखेच स्पर्धा, 23 जानेवारीला सुषमा पाटील शाळा कामोठे येथे किक बॉक्सिंग स्पर्धा, 24 जानेवारीला सुषमा पाटील शाळा कामोठे येथे ज्युडो स्पर्धा, तर 25 जानेवारीला सुषमा पाटील शाळा कामोठे येथे तायक्वांदो स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ 29 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. या संदर्भात कामोठ्यातील रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये रविवारी नियोजन बैठक झाली. या वेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, जगदीश गायकर, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, संजय भगत, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, हर्षवर्धन पाटील, दिलीप भगत, विद्या तामखडे, महिला मोर्चाच्या वनिता पाटील, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत स्पर्धांबाबतचे नियोजन करून सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, या स्पर्धांचा क्रीडारसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर व माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply