पंढरपूर ः प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत पैसा कमी पडू देणार नाही. प्रसंगी शेतकर्यांसाठी तिजोरी रिकामी करण्याचीही सरकारची तयारी आहे, असा दावा पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केला आहे.
दुष्काळी पाहणी दौर्याच्या निमित्ताने काल जानकर यांनी सांगोला तालुक्यातील विविध छावण्यांमध्ये जाऊन शेतकर्यांशी चर्चा केली. जनावरांना देण्यात येणार्या चार्यात तीन किलोने वाढ केल्याचे सांगत जनावरांची संख्या आणि इतर जाचक अटीदेखिल शिथिल केल्या जाणार असल्याचे संकेत जानकर यांनी दिले. गेल्या वर्षी छावण्यांत झालेले गैरप्रकार टाळण्यासाठी संपूर्ण डिजिटलायझेशन केल्याचा दावा जानकर यांनी केला. राज्यात एकूण एक कोटी 12 लाख पशुधन असून, सरकारने सुरू केलेल्या 1248 छावण्यांमध्ये आठ लाख जनावरे दाखल झाल्याचे जानकर यांनी सांगितले.
पशूपालकांच्या मागणीनुसार प्रत्येकी जनावर 15ऐवजी आता 18 किलो चारा देण्यात येणार आहे, तर जनावरांना बॅच मारण्यासाठी शेतकर्यांकडून घेतलेले सहा रुपयेदेखील परत करण्यात येणार आहेत. याशिवाय जनावरांचा विमादेखील सरकार काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महादेव जानकर यांना राज्यातील लोकसभेचा निकाल काय असेल, असे विचारले असता माढा, बारामती आणि सांगलीसह किमान 42 जागा भाजप-शिवसेना महायुती जिंकेल, असा ठाम विश्वास जानकर यांनी व्यक्त केला. दुष्काळी पाहणी दौर्यावर आलेले पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी काल सांगोला तालुक्यातील यमगर मंगेवाडी येथे छावणीतच मुक्काम केला.