अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग-उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे गुरुवारी (दि. 15) दीर्घ आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. दुर्दैवी योगायोग म्हणजे 15 जुलैलाच त्यांचा 74वा वाढदिवस साजरा होणार होता, मात्र जन्मदिनीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. सातीर्जे या जन्मगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मधुकर ठाकूर यांचे निधन झाल्याचे वृत्त कळताच सामान्य कार्यकर्ते, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या अलिबागेतील निवासस्थानी धाव घेतली. गरीब शेतकरी कुटुंबात 15 जुलै 1947 रोजी तालुक्यातील सातीर्जे गावी मधुकर ठाकूर यांचा जन्म झाला. मधुकर ठाकूर यांच्या राजकीय प्रवासाला खरी सुरुवात 1970-80 दशकात शेतकरी कामगार पक्षातून झाली. पुढे त्यांचे शेकापशी तात्त्विक मतभेद झाल्याने त्यांनी शेकापला राम राम ठोकला. शेकाप सोडल्यानंतर मधुकर ठाकूर यांनी 1992मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्षपद मिळाले. ते रायगड जिल्हा परिषदेचे सदस्यही झाले. 1999मध्ये त्यांना अलिबाग-उरण विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2004च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते.
माजी आमदार मधुकर ठाकूर कणखर व करारी बाण्यामुळे रायगडच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिले. प्रेमळ आणि खर्या स्वभावामुळे माझ्यासारख्या असंख्य सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मनात घर करून राहिलेले एक सर्वस्पर्शी नेतृत्व हरपले. आज त्यांचा वाढदिवस होता आणि आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला हे दुःखद आहे.
-अॅड. महेश मोहिते, अध्यक्ष, भाजप दक्षिण रायगड जिल्हा