वाराणसी ः प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संमेलन केंद्राचे (रुद्राक्ष) गुरुवारी (दि. 15) उद्घाटन केले. जपानच्या सहकार्याने तयार झालेले हे केंद्र जपान-भारताच्या मैत्रीचे प्रतीक आहे. वाराणसीमध्ये ही योजना सुरू करण्याचा उद्देश आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रात लोकांच्या सामाजिक व सांस्कृतिक संवादाची संधी उपलब्ध करून देणे हे आहे. या रुद्राक्ष केंद्रामध्ये भारताचे प्राचीन शहर असलेल्या काशीच्या सांस्कृतिक समृद्धीची झलक पाहायला मिळते. वाराणसीतील सिगरा भागात 2.87 हेक्टर जमिनीवर तयार करण्यात आलेल्या या दुमजली केंद्रामध्ये 1,200 लोकांच्या बैठकीची क्षमता आहे. या संमेलन केंद्रात अॅल्युमिनिअमने बनलेले 108 रुद्राक्षही लावण्यात आले आहेत, तर याचे छत शिवलिंगाच्या आकाराचे बनविण्यात आले आहे. ही संपूर्ण इमारत रात्रीच्या वेळी एलईडी लाइटमध्ये झगमगून जाते. आंतरराष्ट्रीय संमेलने, प्रदर्शने, संगितिक कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांच्या आयोजनासाठी ही योग्य जागा आहे. या केंद्राच्या गॅलरीज भित्तीचित्रांनी सजविण्यात आल्या आहेत. केंद्रातील जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून सहकार्य लाभलेल्या ’वाराणसी कन्व्हेन्शन सेंटर’च्या मुख्य हॉलला गरज पडल्यास छोट्या भागांमध्ये विभाजित केले जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या ठिकाणी जपानचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या वेळी रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरच्या परिसरात पंतप्रधानांनी रुद्राक्षाचे एक झाडही लावले आहे.
Check Also
वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन
पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …