मुंबई ः प्रतिनिधी
खांद्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आयपीएल 2021च्या पहिल्या टप्प्यातून बाहेर पडला होता. त्याच्या जागी ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनविण्यात आले. आता श्रेयस दुखापतीतून सावरला असून त्याने सरावही सुरू केला आहे, मात्र त्याने इंग्लंडमध्ये होणारी वनडे स्पर्धा रॉयल लंडन कपमधून माघार घेण्याचे ठरवले आहे. तो सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार्या आयपीएलच्या दुसर्या टप्प्यात मैदानात पुनरागमन करू शकतो. श्रेयर अय्यर म्हणाला, मी या मोसमात लँकेशायरकडून खेळू शकणार नाही. हा एक क्लब आहे, ज्याचा इतिहास खूप मोठा आहे. मला येथे भविष्यात खेळण्याची आशा आहे. क्लबचे संचालक पॉल अॅलोट यांनी सांगितले की, आम्ही निराश आहोत, कारण आम्ही श्रेयसचे ओल्ड ट्रॅफर्डमध्ये स्वागत करण्यास पूर्णपणे उत्सुक होतो, परंतु लँकेशायर क्रिकेट त्याच्या या निर्णयाचा पूर्ण आदर करते. श्रेयसला आम्ही शुभेच्छा देतो. आम्हाला खात्री आहे की, भविष्यात तो या संघाचा भाग होईल. आयपीएल 2021च्या आधी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. यामुळे तो काही महिने क्रिकेटपासून दूर होता.