नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेपूर्वीच तीन भारतीय बॅडमिंटनपटूंना कोरोनाची लागण झाली असून, एक सहाय्यक कर्मचारीदेखील कोरोना संक्रमित आढळला आहे. उर्वरित खेळाडूंचे अहवाल येणे बाकी आहे. कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली नाहीत.
पॉझिटिव्ह झाल्याबद्दल भारतीय प्रशिक्षक मॅथेस बो यांनी आश्चर्य व्यक्त केले. दोन आठवड्यांपूर्वी आम्ही ज्युरिखमध्ये क्वारंटाइन होतो. 14 दिवसांत पाच वेळा चाचणी झाली. सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्यात. आता अचानक पॉझिटिव्ह कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पी. व्ही. सिंधूवर भारताची भिस्त
या स्पर्धेमध्ये विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूवर भारताची भिस्त असेल. स्विस खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवातून सावरत जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी ती उत्सुक आहे. 2019च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर तिला एकही स्पर्धा जिंकता आली नाही. पाचव्या मानांकित सिंधूची पहिली लढत मलेशियाच्या सोनिया चीहशी होणार आहे, तर उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकानी यामागुचीशी तिची गाठ पडेल. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाचा पहिल्या फेरीत सातव्या मानांकित डेन्मार्कच्या मिआ ब्लिशफेल्डशी सामना होणार आहे.
पुरुषांमध्ये श्रीकांत आणि कश्यपकडून अपेक्षा
पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतकडून भारताला पदकाच्या प्रमुख आशा आहेत. श्रीकांतची पहिली लढत इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोशी असेल, तर जागतिक कांस्यपदक विजेत्या बी. साईप्रणितला फ्रान्सच्या टॉमा ज्युनियर पुपोव्हशी भिडावे लागेल.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या पारुपल्ली कश्यपची पहिली लढत जागतिक क्रमवारीत अग्रक्रमांकावर असलेल्या केंटो मोमोटाशी होईल. एच. एस. प्रणॉयचा पहिला
सामना मलेशियाच्या डॅरेन लीवशी, तर समीर वर्माचा वायगॉर कोएल्होशी होणार आहे. पुरुष दुहेरीत जागतिक पुरुष दुहेरी क्रमवारीत सध्या 10व्या स्थानावर असलेल्या सात्त्विक
साईराज रन्कीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्यावर भारताची मदार असेल.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …