Breaking News

संभाव्य तिसरी लाट

देशात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. एकीकडे दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसर्‍या लाटेची शक्यता आहे. त्या दृष्टीने शासन-प्रशासन कार्यरत आहेत. तिसरी लाट मुलांवर परिणाम करणार असल्याचे म्हटले जात असल्याने मुलांचे लसीकरण सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोना हा मानवाच्या मागे एखाद्या राक्षसासारखा लागला आहे. गेले जवळपास दीड वर्ष त्याचा प्रादूर्भाव अद्यापही जगभरात असून त्याने एखादे महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती यांच्यापेक्षा जास्त विद्ध्वंस केलेला आहे. भारतातही कोविड-19 विषाणूचा संसर्ग कायम आहे. या घातक विषाणूने अनेकांचा बळी घेतला, तर कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केली. या वैश्विक महामारीमुळे अनेक हसते-खेळते लोक अकाली गेले. अनेक घरांतील कर्ता माणूस गेल्याने ते परिवार उघड्यावर आले, तर पालक गमावल्याने काही मुले अनाथ झाली. गेल्या वर्षी ही महामारी जेव्हा नवी होती तेव्हा तिची प्रचंड दहशत होती. लोकांना काय करावे आणि काय करू नये हेच उमजत नव्हते. यंत्रणाही हतबल होती. वर्षाअखेरीस लसींचे उत्पादन सुरू झाले आणि जीवात जीव आला. अमेरिका, इंग्लंड आदी देशांपाठोपाठ भारतातही लसीकरण सुरू झाले. आधी कोविड योद्धे, मग ज्येष्ठ, प्रौढ, तरुण यांचे टप्प्याटप्प्याने लसीकरण प्राधान्य ठरवले गेले. शहरी लोकांनी लस घेऊन जीव सुरक्षित केला आहे. ग्रामीण भागात गैरसमजुती, भीती असल्याने लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. लसीकरणामुळे कोरोनाची लागण होणार नाही असे नाही. अनेकांनी लस घेऊनही त्यांना कोरोना झालेला आहे, परंतु लस घेतल्यानंतर हा आजार जीवावर बेतण्यापासून वाचण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय लस घेणे सुरक्षित असून तिचे विपरित परिणाम झाल्याची फार उदाहरणे नाहीत. सध्याच्या घडीला लस हीच कोरोनावर प्रभावी प्रतिबंधक मात्रा आहे. आपल्या देशात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्यानंतर आता तिसर्‍या लाटेचा धोका असल्याचे तज्ज्ञ मंडळींकडून सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे या तिसर्‍या लाटेत मुलांना संसर्ग होईल, असे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. सध्या देशात 18 वर्षांवरील नागरिकांना लसीचे डोस दिले जात आहेत. येत्या काळात लहान मुलांनाही लस दिली जाईल. त्या दृष्टीने चाचण्यासुद्धा घेण्यात येत आहेत. या चाचण्यांचे निष्कर्ष सप्टेंबर महिन्यात येतील, असा ‘एम्स’चा कयास आहे. भारत बायोटेक कंपनीची कोरोना लस कोवॅक्सिनचा लहान मुलांवर प्रयोग करण्यात येत आहे. याचे निष्कर्ष सप्टेंबरपर्यंत येण्याची आशा आहे, असे एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. त्यानंतर लहान मुलांच्या लसीकरणासह सुरुवात होईल. लसीकरण तर चालूच आहे, पण नागरिकांनीही स्वतःसह कुटुंबीयांची काळजी घेणे आवश्यक आहे, मात्र काही लोक रुग्णसंख्या घटत असल्याचे पाहून पुन्हा गर्दी करू लागले आहेत. हे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे. आताच्या काळात सण-उत्सव भान राखून साजरे करणे उचित ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात कोरोनाचे संकट अद्याप गेलेले नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात नियमाचे पालन करा. सण-उत्सव साजरे करताना कोरोना गेला नाही हे लक्षात ठेवा, असे आवाहन केले आहे. एकंदर तिसरी लाट येईल की नाही हे माहीत नाही, पण तिला आपण वाट का करून द्यावी. त्याऐवजी नियम पाळून सुरक्षित राहूया.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply