खोपोलीत नामफलक पायदळी; भाजपकडून निषेध
खोपोली : प्रतिनिधी
खोपोलीत राज्यपालांच्या कथित विधानाबद्दल निषेध करताना महाआघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेला फलक पायदळी तुडविला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे समस्त शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून भारतीय जनता पक्षाने या प्रकाराचा जाहीर निषेध केला आहे.
खोपोली शिळफाटा येथे बुधवारी (दि. 23) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ महाआघाडीतर्फे राज्यपालांच्या कथित विधानाबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी जो फलक झळकविण्यात आला त्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराजांचे ठळक अक्षरात नाव होते व खालच्या बाजूला राज्यपालांचा फोटो, मात्र राज्यपालांचा निषेध करताना बॅनर कार्यकर्त्यांनी पायदळी तुडवल्यावर असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा त्यांना विसर पडला. या घटनेचे पडसाद उमटले आहेत.
माफी मागा -अश्विनी पाटील
सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाने या अश्लाघ्य प्रकाराचा निषेध केला. जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्ष अश्विनी पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीचा खरपूस समाचार घेतला. मते मागताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतात, पण त्यांच्याच नावाचा फलक पायदळी तुडवता याबाबत महाआघाडीने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्यासमवेत खोपोली भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल व सरचिटणीस हेमंत नांदे उपस्थित होते.
बाळासाहेबांच्या शिवसेनेकडूनशिवपुतळ्याला दुग्धस्नान
या घटनेचा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडूनही निषेध करण्यात आला आहे. यांनी गुरुवारी (दि. 24) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाने स्नान घालून महाआघाडीच्या या कृत्याबद्दल निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. या निषेध आंदोलनात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील, तात्या रिठे, राजू गायकवाड, अमोल पाटील, ईश्वर शिंपी, मंगेश मोरे, संतोष माळकर, राकेश मिरवणकर, प्रशांत गोरे, रूपेश देशमुख, मुकेश रुपवते, अनुराग कोंडवले, संदीप नानेकर, किशोर पाटील, संतोष म्हामुणकर, राकेश गायकवाड, निनाद वाजे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.