Breaking News

हिंमत असेल तर एका व्यासपीठावर या

श्रीरंग बारणे यांचे विरोधकांना आव्हान

खोपोली : प्रतिनिधी

आजपर्यंत सात निवडणुका लढवल्या, आजवर कोणीही शिक्षण विचारले नाही. राष्ट्रवादी पक्षाला या निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणावरून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मला मराठी उत्तम बोलता येते, असे सांगून ’एका व्यासपीठावर या, तुम्ही बोलाल त्या भाषेत उत्तर देतो’, असे सडेतोड उत्तर महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले.

आकुर्डी येथे भारतीय कामगार सेनेचा कामगार मेळावा झाला. या मेळाव्यात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे बोलत होते. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर शिक्षणावरून आरोप केले होते. त्यासंदर्भात बारणे बोलत होते. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला लिहून दिलेले भाषणदेखील वाचून दाखवता येत नाही, लिहिलेले मराठी वाचण्यासाठीही अडखळतात, असा पलटवारही त्यांनी केला.

खासदार बारणे म्हणाले, ज्यांनी शहराला लुटले, निरपराध शेतकर्‍यांवर गोळीबार घडवून आणला, त्यांच्याशी माझी लढाई आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पत्तासुद्धा सापडत नाही, नंतर उमेदवार सापडणं तर दूरची गोष्ट आहे. उमेदवाराला उभं करायचं आणि वार्‍यावर सोडायचं, ही सवय राष्ट्रवादी पक्षाची आहे.

अझमभाई पानसरे यांनी 2009 साली लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने मतदारसंघातील कोणत्याही कार्यकर्त्यांना फोन केले नाहीत. आता घरातील उमेदवार निवडणूक लढवत असल्याने अजित पवार मावळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांना फोन करीत आहेत. केवळ घरचा उमेदवार असल्याने पवार घराण्याची ही धावपळ सुरू आहे, असेही बारणे म्हणाले.

आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार मधुकर बाबर, शहर प्रमुख योगेश बाबर, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष मनोहर भिसे, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांच्यासह कामगार या मेळाव्याल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply