Breaking News

रायगड जिल्ह्यात एकूण 69.04 टक्के मतदान

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात 69.04 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा दोन टक्क्यांनी, तर या वेळच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा 10 टक्के मतदान वाढले आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गुरुवारी (दि.21) पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्यासमवेत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व उपनिवडणूक अधिकारी नितीन वाघमारे उपस्थित होते.
जिल्ह्यात 24 लाख 88 हजार 788 मतदार आहेत. त्यापैकी 17 लाख 16 हजार 403 मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. 69.80 टक्के पुरुष मतदारांनी आणि 68.12 टक्के महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पनवेल मतदारसंघांत मतदान करण्यात पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त आहे. तेथे 58.28 टक्के पुरुष, तर 59.19 टक्के महिलांनी मतदान केले.
अलिबाग मतदारसंघात सर्वात जास्त 77.15 टक्के, तर पनवेल मतदारसंघात सर्वात कमी 58.70 टक्के मतदान झाले आहे. याशिवाय उरणमध्ये 76.80, कर्जत 74.29, पेण 73.02, महाड 71.53 आणि श्रीवर्धनमध्ये 61.37 टक्के मतदान झाले. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या विधनसभा निवडणुकीत दोन टक्के मतदान वाढले आहे. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत 67.33 टक्के मतदान झाले होते, तर याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या विधानसभा निवडणुकीत 10 टक्के मतदान वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत 60.51 टक्के मतदान झाले होते.
23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी सर्व केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदानकेंद्रांवर त्रिस्तरीय बंदोबस्त असेल. पहिल्या टप्प्यात निमलष्कारी दल, दुसर्‍या टप्प्यात राज्य राखीव पोलीस दल, तिसर्‍या टप्प्यात स्थानिक पोलीस दल असा बंदोबस्त असेल. सर्व टप्प्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त सर्व मतमोजणी केंद्रावर 100 पोलीस कर्मचारी व 10 पोलीस अधिकारी असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply