कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी नवी मुंबई मनपाचे नागरिकांना आवाहन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोना प्रादूर्भाव कमी होत असला तरी आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल केल्यानंतरही नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक मास्क वापरणे, वेळोवेळी स्वच्छ हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि आरोग्याची काळजी घेणे. या नियमांत शिथिलता दिलेली नाही हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नागरिकांना निर्बंधांत शिथिलतेनंतरही नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णसंख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. शहरात प्रतिदिन सरासरी 50 नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य कर्मचार्यांवरील बराचसा ताण हलका झाला आहे. शिवाय शहरात रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेने शहराला चांगलाच फटका बसला होता, मात्र महापालिकेच्या नियोजनबद्ध उपाययोजनेने परिस्थिती लवकर आटोक्यात आणून अद्याप नियंत्रणात ठेवण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे शहरातील निर्बंध शिथिल होण्यास मदत झाली आहे. नागरिकांनी अशाच प्रकारे नियमांचे पालन करून रुग्णसंख्या आटोक्यात ठेवल्यास तिसर्या लाटेला रोखण्यास पालिका प्रशासनाला अधिक सोपे जाणार आहे.
सध्या पालिकेची लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. प्राधान्याने 45 वर्षांवरील नागरिकांना सुरक्षित करण्यात येत आहे, मात्र राज्य शासनाकडून लस पुरवठा कमी होत असल्याने महापालिका हतबल झाली आहे. संभाव्य तिसर्या लाटेला तोंड देण्यास पालिका सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त अभिजित बांगर करत आहेत. यापूर्वी दोन्ही लाटेत पालिकेने परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळल्याने आता तिसर्या लाटेचा तडाखा शहराला बसणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने शासनाने शहरातील कोरोना निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे पुढील काळात रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आल्याने नवी मुंबई परिवहन उपक्रमाने आपल्या बसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असला, तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. यापूर्वी सराकारी कार्यालयात 50 टक्केच उपस्थितीसाठी परवानगी होती, मात्र निर्बंध शिथिल झाल्यामुळे सरकारी आणि खाजगी कार्यालये 100 टक्के उपस्थितीत सुरू झाली आहेत. शहरातील बाजारपेठा 10 पर्यंत सुरू राहणार आहेत. लोकल प्रवासासाठी परवानगी नसल्याने बसमध्ये गर्दी होण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरात रुग्णसंख्येचा आकडा पुढील परस्थिती ठरवणार आहे.