Breaking News

दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई ः प्रतिनिधी
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी (दि. 21) केली आहे. बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मेदरम्यान घेण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले. राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर, तर दहावीची परीक्षा 3 मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे संकेत गायकवाड यांनी यापूर्वीच दिले होते.
बारावीच्या परीक्षांचा निकाल जुलै महिना संपण्याआधी लावण्याचा मंडळाचा प्रयत्न असून, दहावीचे निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी लावले जातील, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले. दरवर्षी साधारण फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी-बारावीची परीक्षा सुरू होते, मात्र यंदा कोरोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत. ऑनलाइन वर्गावर भिस्त ठेवून आता परीक्षांची तयारी विभागाने सुरू केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या. त्यानंतर आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांत उत्सुकता होती.
सीबीएसईच्या परीक्षा 4 मेपासून
केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 31 डिसेंबर रोजी दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून लेखी परीक्षा 4 मेपासून, तर प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्चपासून होणार असल्याचे म्हटले आहे. सीबीएसई दहावी- बारावीच्या लेखी परीक्षा 4 मेपासून सुरू होणार असून 10 जूनपर्यंत चालणार आहेत. त्यापूर्वी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. 1 मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील. परीक्षांनंतर निकालही लगेच जाहीर करण्यात येणार असून, 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होतील. परीक्षांबाबतचा निर्णय विद्यार्थी, शिक्षक, पालक अशा सर्व घटकांनी दिलेल्या सूचना लक्षात घेऊन जाहीर करण्यात आल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले.

Check Also

सामाजिक कार्यकर्ते गुलशन पाटील यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच सर्वसामान्य आणि गोरगरिबांचा आवाज बुलंद करण्याचे काम करते …

Leave a Reply