पनवेल : बातमीदार
लॉकडाउन जाहीर झाल्यापासून सर्व ठिकाणची कामे थांबली होती. अनेक महत्त्वाचे प्रकल्पही रखडले. त्यामुळे सरकारकडून काही प्रकल्पांची कामे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकीच एक म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प. या प्रकल्पाची बंद पडलेली अंतर्गत कामे सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून या कामांनी आता वेग घेतला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा प्रकल्प केवळ नवी मुंबईसाठी नव्हे, तर देशासाठी महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील विकासपूर्व कामे अंतिम टप्प्यात असतानाच लॉकडाऊनमुळे ती बंद पडली. अनेक ठिकाणी कामगार उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. आता सरकारने अनेक उद्योगांना, प्रकल्पांना काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार सिडकोच्या वतीने विमानतळ उभारणीचे काम सुरू करण्याची परवानगी घेण्यात आली आणि रखडलेल्या कामांना सुरुवात करण्यात आली. येथील भूखंड विकसित करण्याचे काम आता वेगाने सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर अंतिम टप्प्यात आलेले उलवे नदीपात्र रुंदीकरणाच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. काही ठिकाणी सपाटीकरणाचे काम बाकी होते, तेही सुरू झाले आले. ही कामे आता 15 ते 20 दिवसांत पूर्ण होतील, या अनुषंगाने सिडको अधिकारी आणि कर्मचारी, कामगार काम करीत आहेत.
या कामासाठी लागणारे कामगार, मजूर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून या ठिकाणी अडकून बसले होते. त्यांना सिडकोने थांबवून ठेवले होते. या कामगारांना आता काम मिळाले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने कामगारांना संसर्ग होऊ नये म्हणून कामगारांची काळजी घेतली जात आहे. विकासपूर्व कामातील रखडलेली कामे या महिनाभरात मार्गी लागतील, अशी आशा आहे.
विमानतळाच्या उभारणीतील पहिल्या टप्प्यातील विकासपूर्व कामे सुरू झाली आहेत. या 15 ते 20 दिवसांत ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वच कामे अंतिम टप्प्यात होती. त्यामुळे ती या काही दिवसांतच पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.
-डी. एस. धायटकर,
सिडको इंजिनिअर, नवी मुंबई आतंररराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प