श्री काळभैरवनाथ, जोगेश्वरी, रवळनाथाची पालखी सहाणेवर
पोलादपूर : प्रतिनिधी
ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ, श्रीजोगेश्वरीमाता आणि श्रीरवळनाथांचे पालखीतून भैरवनाथनगर सहाणेवर आगमन होताच पोलादपूर शहरात मोठ्या जल्लोषात ग्रामदैवतांचा शिमगोत्सव सुरू झाला. गुरुवारी रात्री देवस्थानचे सरपंच बाबूराव महाडीक यांच्या हस्ते होळीची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून होळी प्रज्वलनाने खर्या अर्थाने शिमगोत्सवाची रंगत द्विगुणित झाली. या वेळी असंख्य महिला, पुरूष भाविकांनी ग्रामदैवतांचे दर्शन आणि होळीचे दहन यासाठी आवर्जून उपस्थिती दर्शवून भक्तीभाव जोपासला.
गुरुवारी सकाळी समशेर सोनार तसेच सुंदरशेठ पालकर सोनार या सेवेकर्यांच्या वंशजांकडे ग्रामदैवतांची चांदीची रूपं सेवेला आल्यानंतर पालखीमध्ये देव अलंकारांनी सजवून सायंकाळी पालखीचे आगमन भैरवनाथनगर सहाणेवर खालूबाजाच्या निनादात झाले. या वेळी मोठ्या आकाराचे दगडाचे गोटे अंगावर लिलया खेळविणे तसेच सासनकाठी नाचविणे यासोबतच खालूबाजाच्या तालावर फेर धरून नाचण्यात तल्लीन होण्यात भाविकांनी धन्यता मानली. भाविकांनी दिलेल्या लाकूडफाट्यासह गवत आणि पालापाचोळ्याची होळीच्या मैदानात योग्य मांडणी करण्यासाठीचा थरार आणि शेकडो हातांनी रचलेली होळी याचे दर्शनही या वेळी झालेे. या रचलेल्या होळीची श्रीकाळभैरवनाथ देवस्थानचे सरपंच बाबूराव महाडीक यांच्या हस्ते आरती करण्यात आल्यानंतर होळीचा होम पेटविण्यात आला. होळीत श्रध्देने टाकलेले नारळ पेटत्या होमातून काढण्याचे कसब या वेळी अनेक तरूणांनी दाखविले.
रंगपंचमीपूर्वी रात्री ग्रामदेवतांचा भंडारा होणार असून रंगपंचमीला पहाटे ग्रामप्रदक्षिणेला ग्रामदैवतांची पालखी निघणार आहे. पोलादपूर शहरात देवांच्या पालखीसोबत रंगपंचमीला सुरूवात होत असते.