पाली : प्रतिनिधी
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तर्फे शनिवारी (दि. 14) सकाळी 11 वाजता पाली (ता. सुधागड) येथील भक्तनिवास शेजारील सभागृहात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक विक्रेत्यांचा रोजगार वाढून रानभाज्यांना ओळख आणि बाजार मिळावा, या हेतूने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात रानभाज्यांची विक्री करण्यात येणार असून इच्छुकांनी खरेदी व विक्रीत सहभागी व्हावे, तसेच महिला शेतकरी आणि महिला गटांनी तयार केलेल्या पाककृती या रानभाजी महोत्सवामध्ये ठेवण्यात येणार आहेत. पाककला स्पर्धेत सहभागी होणारा गट किंवा महिला शेतकर्यांना स्वातंत्र्य दिनी तहसीलदारांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रानात नैसर्गिकरीत्या उगवल्या जाणार्या रानभाज्यांमध्ये पौष्टिक अन्नघटक व औषधी गुणधर्म मुबलक असतात. या रानभाज्या नैसर्गिकरीत्या उगवत असल्यामुळे त्या पूर्णपणे सेंद्रिय असतात. या रानभाज्यांचे आरोग्यविषयक महत्त्व व माहिती जास्तीत जास्त नागरिकांना होण्यासाठी तालुकास्तरावर रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्राजक्ता पाटील-काटकर (8806600146) यांना संपर्क करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
सुधागड तालुक्यातील नागरिक, महिला शेतकरी व शेतकरी गटांनी या रानभाजी महोत्सवात सहभाग नोंदवावा. -जे. बी. झगडे, तालुका कृषी अधिकारी, सुधागड