मुंबई, नवी दिल्ली : प्रतिनिधी, वृत्तसंस्था
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दररोज वाढतच आहे. हा आकडा आता पावणेदोनशेच्या वर पोहोचला आहे. त्यात मुंबईत सात जण, तर नागपूर, कल्याण आणि डोंबिवलीत प्रत्येकी एक असे तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कोरोनाग्रस्त दाखल आहेत. शुक्रवारी दिवसभरात एकूण 17 नवीन रुग्ण आढळले होते. सांगलीमध्ये नवे 12 आणि नागपूरमध्ये पाच रुग्ण आढळले. त्यानंतर राज्यात शनिवारी 10 रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 169वर पोहोचली आहे. नवी मुंबईत दीड वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे, तर डोंबिवलीमध्ये आढळलेला रुग्ण एका लग्नसोहळ्यात गेला होता. तिथे त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे राज्यात कोरोनाबधितांची संख्या वाढत असताना यवतमाळमधून दिलासा देणारी बातमी आली आहे. यवतमाळ येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या तीन कोरोनाबाधित रुग्णांचे अखेरचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या तिघांनाही सुटी देण्यात आली. यासोबतच यवतमाळ रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे.
देशभरात कोरोना व्हायरसचा धोका मात्र वाढत चालला आहे. भारतात आतापर्यंत 935 जणांना कोरोना झाल्याचे समोर आले असून एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशात दोन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 200हून अधिक नवे रुग्ण आढळून आले, तर 67 रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली.
जगभरातील रुग्ण सहा लाखांच्या घरात
लंडन : कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध देशांमध्ये मिळून आतापर्यंत 27,370हून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे, तर जवळपास सहा लाख जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एक लाख 33 हजार 373 लोक बरे झाल्याची माहिती आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Check Also
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य मूट कोर्टचे बुधवारी उद्घाटन
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक …
RamPrahar – The Panvel Daily Paper