कर्जत : प्रतिनिधी
कोविशिल्ड लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. कर्जत हा आदिवासीबहुल तालुका असल्याने अर्ध्यापेक्षा अधिक लोकांकडे मोबाइल नाहीत आणि नेटवर्क बाबतीत सर्वत्र बोंबाबोंब आहे. यावर शासनाने काहीतरी मार्ग काढावा, अशी मागणी या परिसरातून होत आहे. आदिवासी भागात एकमेव असलेल्या कशेळे (ता. कर्जत) ग्रामीण रुग्णालयात आजूबाजूच्या 50 गावांतील आदिवासी रोज येऊन लस मिळण्याची वाट बघत असतात. काही दिवस फेर्या मारून लस मिळाली नाही की ते लस घेण्याचा नाद सोडून देतात. आज लसीचे किती डोस येणार आहेत? हे येथील दवाखान्यात पोहचेपर्यंत खुद्द डॉक्टरांनासुद्धा माहीत नसते, परंतु बाहेरील लोकांना त्याची माहिती आधीच होते. ते सुशिक्षित असल्याने नोंदणी करून आरामात येऊन डोस घेऊन जातात आणि येथील स्थानिक आदिवासी मात्र आशाळभूत नजरेने त्यांना पाहत राहतात. हे असेच चालू राहिले, तर स्थानिकांना किमान वर्षभर तरी लस मिळणे शक्य नाही. स्थानिकांना प्रथम लस मिळेल, यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत अन्यथा येथील केंद्रावर येऊन नाईलाजाने बाहेरून आलेल्या लोकांना पिटाळून लावावे लागेल, असे येथील सामाजिक कार्यकर्ते उदय पुंडलिक पाटील यांनी सांगितले.
सुरुवातीला लसीकरणाचे महत्त्व कुणालाच कळले नव्हते. त्या वेळी बाहेरच्या अनेकांनी कशेळे ग्रामीण रुग्णालयात येऊन लस घेतली, मात्र आता ऑनलाइन नोंदणीमुळे आदिवासी बांधवांची अडचण होत आहे. यातून लवकर मार्ग काढावा अन्यथा आदिवासींचे लसीकरण होणार नाही आणि तालुक्यातून कोरोना हद्दपार करण्यास अडथळा होईल.
-उदय पुंडलिक पाटील, सामाजिक कार्यकर्ते, कशेळे, ता. कर्जत