देशात एकीकडे कोरोना लसीकरण मोहीम जोमाने सुरू असताना दुसरीकडे निर्बंध हटविल्यानंतर वाढत्या गर्दीतून कोविड-19 विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असून मागील चार दिवसांपासून रुग्णसंख्या 40 हजारांचा टप्पा ओलांडत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागल्याचे काही दिवसांपूर्वी दिसून येत होते. अजूनही रुग्णसंख्या हाताबाहेर गेलेली नाही, पण अशीच जर गर्दी होत राहिली तर कोरोनाची तिसरी लाट येण्यास वेळ लागणार नाही. दुसरी लाट महाराष्ट्रासह देशाला भारी पडली. असे म्हणतात की समुद्रात गेलेली लाट जेव्हा परत येते तेव्हा ती दुप्पट ताकदीने येत असते. कोरोनाची दुसरी लाट तर त्सुनामी घेऊन आली. ही दुसरी लाट भरात असताना देशभरात चार लाखांच्या आसपास दैनंदिन रुग्ण आढळून येत होते. यात एकट्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या जवळपास सुमारे 60 टक्के होती. मृत्यूचे प्रमाणदेखील कमालीचे वाढले होते. अखेर मे महिन्याअंती रुग्णसंख्या घटू लागली. त्यामुळे राज्यात जूनपासून निर्बंध हटविण्यास सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. निर्बंध हटल्यानंतर पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. त्यातच आता सण-उत्सव आल्याने लोक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत आहेत. सणवार साजरे केले पाहिजेतच. यात कुणाचेही दुमत नसेल, पण ते साजरे करताना काही गोष्टी जरूर पाळणे आवश्यक आहेत. कारण मोठे सण-उत्सव अद्याप सुरू झालेले नाहीत. त्या वेळी लोक मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. त्यातून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. तत्पूर्वीच केरळ तसेच महाराष्ट्राच्या काही भागांत कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. हा आजार संसर्गजन्य असल्याने तो पसरण्यास वेळ लागत नाही. कोरोनाची डेल्टा, डेल्टा प्लस अशी नवी रूपे तर प्रचंड वेगाने फैलावतात. राज्यात कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळलेले आहेत. शिवाय आता मूळचाच कोरोना पुन्हा एकदा वाढू लागला आहे. सुक्ष्म निरीक्षण केले तर कोविड-19 विषाणूचा ठराविक भागांमध्येच प्रादुर्भाव होताना दिसत आहे. जिथे मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे तिथे रुग्णवाढ झाल्याचे अद्याप तरी आढळलेले नाही. देशात आतापर्यंत कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक, मॉर्डना, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन आणि झायकोव्ह-डी अशा सहा लसी उपलब्ध झाल्या आहेत. संपूर्ण देशभर सध्या लसीकरण सुरू आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 27 लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी सुमारे चार लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत तीन कोटी 18 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांपेक्षा जास्त आहेत, तर जवळपास तीन लाख 68 हजार रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. आपल्या राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 13 हजार सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. पुण्याप्रमाणेच काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा होऊ लागला आहे. ते पाहता आताच काळजी घेणे गरजेचे आहे. कारण मागच्या वेळीसुद्धा कोरोना आटोक्यात आल्यानंतर पुन्हा त्याचा संसर्ग वेगाने झाला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली होती. तेव्हा सर्वांनी सर्तक राहणे आता काळाची गरज बनली आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …